Mahesh Manjrekar AI Prediction In Entertainment Industry : आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रांत ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ अर्थात AI वापरलं जात आहे. हे तंत्रज्ञान हळूहळू लोकांना त्यांची विविध कामं पूर्ण करण्यास मदत करत आहे. कंटेंट तयार करणं असो, नवीन गोष्टी शिकणं असो किंवा एखादा फोटो तयार करणं असो… ही सगळी कामं ‘AI’च्या मदतीने अगदी काही मिनिटांत केली जात आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात या AIचं शिरकाव झाला आहे.

AI मुळे येत्या काळात माणसांच्या नोकऱ्यांवरही गदा येणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात. आयटी क्षेत्र असो वा मनोरंजन क्षेत्र असो. AI च्या मदतीनं सगळी कामं सोपी झाली आहेत. त्यामुळे या AI चा जितका फायदा आहे, तितकाच संभाव्य धोकासुद्धा आहे, असं मतही काहींनी व्यक्त केलं आहे. या AIचा वापर आता सिनेमाच्या निर्मितीमध्येसुद्धा होतो आहे आणि त्याचमुळे येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होणार असल्याचं मत दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

गेली दोन दशकं महेश मांजरेकरांनी मराठीसह हिंदीत सिनेमा निर्माण करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विविध विषयांवरचे सिनेमे घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं आहे, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे भाकीत केलं.

“येत्या दीड वर्षांत सिनेमा बंद होईल” : महेश मांजरेकर

महेश मांजरेकर म्हणाले, “माझं मत आहे की, दीड वर्षात सिनेमा बंद होईल. बंद म्हणजे बंद. AI आता सगळ्यावर भारी पडत आहे. AI ने बनवलेल्या सिनेमाचे ट्रेलर जर तुम्ही पाहिलेत, तर त्यातील व्हिज्युअल्स तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवणं शक्यच नाही. तुम्ही कितीही चांगले व्हीएफएक्स केलेत तरी त्या सिनेमांसारखे व्हिज्युअल्स दाखवणं शक्यच नाही. मी या AI नं आज घर बसल्या बसल्या ‘टायटॅनिक’ सिनेमामधील लायटिंग, एखादा चांगला हीरो आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम असा सिनेमा करू शकतो.”

त्यानंतर ते सांगतात, “मी ‘महाभारत’चा ट्रेलर पहिला. अक्षरश: डोळे दीपवणारा ट्रेलर आहे. जर हे सगळं एका क्लिकवर होणार असेल, तर लोक कलाकारांसाठी का पैसे खर्च करतील. अर्थात, AI वापरण्यासाठीसुद्धा हुशारी लागेलच. मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेला AI आणि आताचं AI यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्या दिवशी त्यांच्या हाती सिनेमा बनवण्याचा कोड लागेल. त्या दिवशी आपण संपणार. रोज १० हजार सिनेमे बनतील आणि याला काही खर्चही येत नाही.”

“अनेक लोक AI वर सिनेमे बनवणार” : महेश मांजरेकर

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “माझ्या एका मित्राने AI च्या मदतीने अ‍ॅड फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये. त्यामुळे अनेक लोक AI वर सिनेमे बनवणार; पण ते बघणार कोण? त्यामुळे येत्या दीड वर्षात सिनेमे बंद होणार. हे खूपच धोकादायक आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता गुपचूप नाटकांकडे वळलं पाहिजे. येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होणार, हे माझं भाकीत आहे.”