Mahesh Manjrekar Talk About Groupism : बॉलीवूडमध्ये असलेलं ग्रुपिझम (गटबाजी) नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. अनेकदा ही गटबाजी दिसूनही येते. गेल्या काही वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीतही या गटबाजीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या गटबाजीवर कलाकार नेहमीच व्यक्त होत असतात. या गटबाजीचा परिणाम कलाकारांवर आणि पर्यायाने त्यांच्या कामावर होत असल्याचा आरोप अनेक कलाकार करतात. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री सविता मालपेकरांनी मराठीतील या ग्रुपिझमबद्दल थेट भाष्य केलं होतं. अशातच आता या ग्रुपिझमवर महेश मांजरेकर यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
महेश मांजरेकरांनी नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘महेश मांजरेकर मराठीत ग्रुपिझम करतात का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी “हो! हे खरं आहे. मी ग्रुपिझम करतोच.” असं दिलं. याबद्दल ते पुढे म्हणाले की, “त्यात लाजायचं काय? ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? मी पहिल्यापासून नव्या लोकांना चित्रपटात घेतलं आहे. तुम्ही लिस्ट काढून बघा. मी त्या त्या भूमिकेसाठी चांगले वाटणारे सगळे लोक घेतो आणि मराठी लोकांना घेतो. हिंदीमध्येही मराठी लोकांना घेतो.”
यानंतर महेश मांजरेकरांनी म्हटलं की, “सिद्धूला घेऊन मी हिंदी चित्रपट करावा अशी इच्छा आहे. पण ते शक्य नाही, कारण त्यासाठी फायनान्स देणारा कोणीतरी हवा ना? हे अर्ध्या लोकांना कळत नाही. काही लोकांना वाटतं की, चित्रपट झाडावरचे चिंचोके देऊन केला जातो. पण तसं नाही त्यासाठी पैसे लागतात. मला माझ्या एखाद्या मराठी मुलाला घेऊन मोठा हिंदी चित्रपट करायला नक्की आवडेल. यांनाच घेतो आणि त्यांनाच घेतो हे बोलायला काय जातं? पैसे कोण देणार?”
यानंतर महेश मांजरेकरांनी सांगितलं की, “मला सिद्धू हा जगातला श्रेष्ठ नट वाटतो. भरत जाधवही कमाल अभिनेता आहे. पण आता चित्र बदलेल आणि ती वेळ येईल की, आपल्या भरत जाधवला घेऊन मला एक मोठा चित्रपट करता येईल.” पुढे ते म्हणाले की, “मी मिक्टा (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अवॉर्ड्स) शो करायचो तेव्हा पण काही लोक म्हणायचे की, आम्हाला घेऊन जात नाही. अरे मी काय पिकनिक नाही काढली? तो एक अवॉर्ड शो आहे आणि त्यात नॉमिनेशन असतात.”
यापुढे महेश मांजरेकर म्हणाले, “अवॉर्ड्सचे नॉमिनेशन काय मी ठरवत नाही, त्यासाठी परीक्षक असतात. ज्यांना नॉमिनेशन असतं त्यांना घेऊन जातो. मी जेव्हा पाचशे लोकांना खुश करत असतो तेव्हा मी पाच हजार लोकांना नाखुश करत असतो. त्या लोकांना मी हेच सांगू इच्छितो की, माझी तुमच्याशी काही दुश्मनी नाही आणि पाचशे लोकांशीही माझं काही चांगलं नाही. ते नॉमिनेटेड आहेत, त्यामुळे त्यांना घेऊन जातोय. तुम्ही करा, तुम्हालाही घेऊन जाईल. या सगळ्यामुळे मी मिक्टा अवॉर्ड्स बंद केलं.”