Mahesh Tilekar on ungrateful Marathi Actors: दिग्दर्शक महेश टिळेकर हे जितके त्यांच्या शोसाठी, चित्रपटांसाठी, दिग्दर्शनासाठी ओळखले जातात, तितकेच त्यांच्या परखड वक्तव्यांसाठीदेखील ओळखले जातात. मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमातून ते अनेकदा व्यक्त होत असतात. इंडस्ट्रीतील अनेक खुलासेदेखील ते करतात.
“१२ मराठी कलाकारांना…”
महेश टिळेकर यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. मराठी कलाकार हे कृतज्ञ आणि कृतघ्न असतात, असं त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं होतं. तर असं का वाटतं? यावर महेश टिळेकर म्हणाले, “आपण मदत केली असेल तर त्याबद्दल बोलू नये, पण काही अनुभव आले. २०१० मध्ये मी १२ मराठी कलाकारांना सरकारी कोट्यातून घरं मिळतात, ती मिळवून दिली. आपली ओळख आहे, आपल्याबरोबरही त्यांचंही भलं होईल असा विचार केला. त्यातले एक-दोन कलाकार सोडले तर कोणाला त्याची जाणीवही नाही.
“उलट माझ्या एका सहकाऱ्याला जो फ्लॅट मिळाला होता, त्याला चांगला व्ह्यू होता; तर एका अभिनेत्रीने सांगितलं की, माझ्यासाठी तो नंबर लकी आहे, मला तो हवा आहे. मग माझ्या शब्दाखातर माझ्या सहकाऱ्याने तो फ्लॅट तिला दिला. ती स्वत: राहायला गेली नाही. फर्निचर करून घेतलं आणि ती कधीतरी तिथे यायची. तिच्या मित्रांबरोबर फक्त क्षणभर विश्रांतीसाठीच तिथे यायची, नंतर पाच वर्षांनी तिने तो फ्लॅट विकला.
विकताना तिच्या घरातून जो व्हयू होता, त्याचे जास्तीचे पैसे मिळाले. तर मला वाटतं की जाणीव ठेवली पाहिजे की ज्या माणसाने त्याचा फ्लॅट बदलून मला दिला, त्याला विचारायला पाहिजे होतं. मी तिला फोन करून झापलं. तर ती म्हणाली, मी त्याला चांदीचं निरांजन देणार होते. त्यावर तिला म्हणालो की यातच तुझी लायकी कळाली. त्या चांदीच्या निरांजनाची काय किंमत आहे. माणुसकी नसणारी अशी जी आपण लोकं म्हणतो ती ही आहेत.
“ती घरे मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत, कारण मुंबईत घर मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. सरकारी कोट्यातून म्हणजे ते फ्री मिळत नाही, पण मार्केटपेक्षा ते स्वस्तात मिळतं. पण, ती किंमत मराठी कलाकारांच्या दृष्टीने फार मोठी आहे”, असे म्हणत अनेक कलाकारांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवली नसल्याची खंत महेश टिळेकर यांनी व्यक्त केली.