अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीसह हिंदी चित्रपट व वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अमृताने ‘लस्ट स्टोरीज २’ ‘बॉम्बे बेगम्स’, ‘चोक्ड’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिज तसेच ‘गली बॉय’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतीच अमृता ‘जारण’ या मराठी चित्रपटात झळकली. यातील तिचा अभिनय लक्षवेधी ठरला.
अशी कोणतीही मोठी भूमिका आहे का, ज्यासाठी तुला साइन करण्यात आलं होतं, पण शेवटच्या क्षणी रिप्लेस केलं? असा प्रश्न अमृता सुभाषला मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. “नाही. खरं तर मी नशीबवान आहे. कारण मला माझ्या बहुतांशी भूमिका ऑडिशन्सद्वारे मिळाल्या आहेत आणि मी त्या केल्या आहेत. अगदी बॉम्बे बेगम्स किंवा चोक्ड, आणि सेक्रेड गेम्स. मला माझ्या ऑडिशन्सद्वारे काम मिळाले. मी धमाकासाठी ऑडिशन दिली होती. मी सर्व कास्टिंग डायरेक्टर्सची आभारी आहे, ज्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ऑडिशन देण्याची संधी दिली. काहींनी तर दिग्दर्शकांना असंही सांगितलं की मी हे करू शकते, त्यामुळे माझी निवड करावी,” असं अमृता सुभाष म्हणाली.
“कधीकधी दिग्दर्शक मला एखाद्या विशिष्ट भूमिकेत पाहू शकत नाहीत, पण कास्टिंग डायरेक्टर माझ्यासाठी भूमिका घेतात. ते म्हणतात, ‘अरे, चला तिचे ऑडिशन घेऊ,’ आणि मग आपण ऑडिशननंतर निर्णय घेऊ. मी बहुतेक ज्या भूमिकांसाठी ऑडिशन दिले, त्या मला मिळाल्या,” असं अमृताने सांगितलं.
बॉलीवूडमध्ये तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या भूमिका साकारल्या की नंतर तशाच भूमिकेत टाइपकास्ट केलं जातं, अशा काही भूमिका तू नाकारल्या आहेस का? असं अमृताला विचारण्यात आलं.
अमृता म्हणाली, “हो. पण जर कंटेंट चांगला असेल तर मी टाइपकास्टचा विचार करत नाही. पण मी अशा भूमिकेला नकार दिला आहे ज्यासाठी मला चांगले पैसे ऑफर करण्यात आले होते. माझ्या संपूर्ण बँक बॅलन्सच्या दुप्पट ती रक्कम होती, पण ती मला त्यात काहीच नवीन, क्रिएटिव्ह वाटलं नाही म्हणून मी ती भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. पण जर कंटेंट दमदार असेल तर मी फार विचार करत नाही, मग काहीही झालं तरी मी तो चित्रपट करते.”
“काही चित्रपटांसाठी मला चांगले पैसे ऑफर केले जात होते, पण कंटेंट चांगला नव्हता अशा चित्रपटांना मी नकार दिला आहे. ‘जारण’सारखा कंटेंट असेल तर मी प्रॉडक्शन हाऊस लहान असेल तरी होकार देते, चित्रपट करते. मी जितकं मानधन घेते, तेवढं ते मला देऊ शकले नाही तरी मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, कारण कंटेंट दमदार होता,” असं अमृताने नमूद केलं.