सध्या जगभरात कान्स महोत्सवाची चर्चा चालू आहे. १३ मे रोजी मोठ्या थाटामाटात या सोहळ्याला सुरुवात झाली होती. आतापर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. नुकतीच बॉलीवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने कान्सच्या रेड कार्पेटवरून साडी नेसून एन्ट्री घेतली होती. बॉलीवूड कलाकारांसह यंदा काही मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा कान्सला उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळतंय.
छाया कदम, तृप्ती भोईर यांच्या पाठोपाठ लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे कान्स महोत्सवाला पोहोचली आहे. नेहाने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. नेहा तिची हटके फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे कायम चर्चेत असते. आता अभिनेत्रीने कान्समध्ये पदार्पण करून मोठी झेप घेतली आहे.
मराठीसह नेहाने हिंदी कलाविश्व देखील गाजवलं आहे. ‘मे आय कम इन मॅडम?’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. पुढे, नेहा पेंडसे ‘भाभीजी घर पर है’ या हिंदी मालिकेत अनिताच्या भूमिकेत पाहायला मिळाली. नेहा आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नेहाने सातासमुद्रापार असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे.
नेहाने कान्समध्ये फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लूक आता समोर आला आहे. काळ्या रंगाच्या स्लिम फिट ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. याशिवाय आणखी दोन आकर्षक लूक्स नेहा कान्सच्या रेड कार्पेटवर करणार आहे.
कान्सबद्दल बोलताना नेहा सांगते, “प्रत्येक कलाकारासाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असतं आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्तीसारखाच आहे. मला हा लूक डिझाइन करण्यासाठी मनीष घरतने मदत केली. त्याने या लूकसाठी खूप मेहनत घेतली होती. कान्समध्ये पदार्पण करण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती पण, कशाचंही दडपण न घेता इथे येऊन छान एन्जॉय करायचं हेच ठरवून मी आले होते.
दरम्यान, सध्या नेहावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आदिनाथ कोठारे, पूजा सावंत, क्रांती रेडकर, आशिष पाटील, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, सोनाली खरे या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत नेहाला कान्ससाठी शुभेच्छा दिल्या आहेत.