अलीकडच्या काळात बऱ्याच मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्षिती जोगने मंगळसूत्र घालावं की नाही याबाबत एका मुलाखतीत आपलं मत मांडलं होतं. यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आता या मंगळसूत्राच्या चर्चेवर आणखी एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

नाटक व मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री राधिका देशपांडेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत मंगळसूत्र, लग्नपद्धती, स्त्रियांचे विचार यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : तू है मेरी किरण! जुही चावलासाठी मराठमोळ्या गौरव मोरेने केलं असं काही की…पाहा व्हिडीओ

राधिका देशपांडेची पोस्ट

मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही.
मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ?
धमकी वजा सूचना समजा.

उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृतीवर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला.

हा फोटो २००५ सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेव्हापासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं.

हेही वाचा : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ : निलेश साबळेला नवीन कार्यक्रमाचं नाव कसं सुचलं? सांगितला खास किस्सा

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राधिकाने आजवर अनेक नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती नेहमीच विविध सामाजिक विषयांवर आपलं मत मांडते. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत.