Sanskruti Balgude Brother : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल मुलाखतींच्या फेरीनंतर नुकताच जाहीर करण्यात आला. दिवसरात्र अभ्यास, मेहनत करून दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देतात. या परीक्षेत पास होऊन सरकारी अधिकारी व्हायचं हे अनेकांचं स्वप्न असतं. लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या भावाची ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे.

लोकप्रिय मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा भाऊ MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. आजवर विविध मराठी मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमांतून संस्कृती सर्वांच्या भेटीला आली आहे. तिची ‘पिंजरा’ ही मालिका प्रचंड गाजली होती. यानंतर अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्येही काम केलं. सध्या संस्कृती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या विविध पोस्ट, रील्स व्हिडीओचं, फोटोशूटचं चाहते नेहमी कौतुक करत असतात. तिने नुकतीच आपल्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

संस्कृती बालगुडेचा लहान भाऊ MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भाऊ समर्थ बालगुडेबरोबरचा आणि त्याच्या रिझल्टचा फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, “हा माझा लहान भाऊ! MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला….महाराष्ट्रात ४२ वा आलाय. आज त्याचा खूप खूप अभिमान वाटतोय. समर्थ तू कल्पनाही करू शकत नाही इतकी मी आनंदी आहे”

संस्कृतीने भावाच्या निकालाचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यासह मराठी कलाकारांनीही संस्कृतीच्या भावाचं कौतुक केलं आहे.

जयवंत वाडकर, सुखदा खांडेकर, मानसी नाईक, आदिनाथ कोठारे, अश्विनी कुलकर्णी, श्रुती मराठे, स्वानंदी बेर्डे, नंदिता पाटकर अशा अनेक कलाकारांनी संस्कृतीच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या भावाचं भरभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, संस्कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती “संभवामि युगे युगे- कृष्णाच्या दृष्टीने” या डान्स ड्रामामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या कलाकृतीचा शुभारंभ करण्यात येईल.