Marathi Actress Shalaka Pawar : आपल्या वैयक्तिक आयुष्यात कितीही अडथळे आले तरी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, कठीण परिस्थितीला तोंड देत ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मराठी कलाकार नेहमीच सज्ज होतात. काही दिवसांपूर्वीच ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शलाका पवारबरोबर असाच काहीसा प्रसंग घडला.
शलाका दादर ते ठाणे या मार्गावर दुचाकीवरून प्रवास करत होती. यावेळी प्रवासादरम्यान महानगरपालिकेची कचरा गोळा करणारी तिच्या पुढे होती. त्या गाडीतून जड लोखंडी वस्तू घरंगळत आली आणि ती वस्तू थेट अभिनेत्री शलाका पवार यांच्या पायावर आदळली. लोखंडी वस्तू पायाला घासल्यामुळे गंभीर दुखापत झाली असल्याचं पाहताच अभिनेत्री तात्काळ विक्रोळीतील जवळच्या रुग्णालयात पोहोचली. या अपघातामुळे तिच्या पायाला १८ टाके पडले. पायाला मोठी दुखापत झाल्याने शलाकाला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
मात्र, तिच्या नाटकाचे सलग नियोजित ३ प्रयोग होते. अशावेळी शलाकाने कसालाही विचार न करता…अशा बिकट परिस्थितीत पुढे सलग ३ दिवस ठरलेले प्रयोग केले. नाटकाचे प्रयोग रद्द करण्यापेक्षा टाक्यांसह रंगमंचावर उतरणं शलाका पवारने उचित समजलं. सहकलाकारांनीही वेळोवेळी तिची काळजी घेतली. शलाकाला सांभाळून घेतलं.
पण, ३ प्रयोग झाल्यानंतर घडायचं नव्हतं ते घडलंच! ते टाके सुटले. मग पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन बँडेज करावं लागलं. ३ प्रयोग पार पडल्यावर ५ दिवसांच्या ब्रेकनंतर अभिनेत्रीला बराच आराम मिळाला आहे. आता लवकरच होणाऱ्या २१ जूनच्या प्रयोगासाठी शलाका पवार पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे अभिनेत्री तिच्या मालिकेच्या शूटिंगला देखील उपस्थित होती. सध्या ती ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. “माझ्या मालिकेच्या टीमने देखील खूप सहकार्य केलं. प्रेक्षकांशी वचनबद्ध असल्याने दुखापत असतानाही काम करताना हुरुप येतो” असं अभिनेत्रीने महाराष्ट्र टाइम्सशी संवाद साधताना सांगितलं.
दरम्यान, शलाका पवारला ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकासाठी गेल्यावर्षी ‘अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. या नाटकाचं दिग्दर्शन संतोष पवार यांनी केलं आहे.