Siya Patil New Home In Pune : दिवाळीच्या सणात अनेकजण नव्या नव्या गोष्टींची खरेदी करतात. दिवाळीच्या या आनंदमयी सणात कोणी नवीन गाडी खरेदी करतं, तर कोणी एखादी नवीन वस्तू. अनेकजण दिवाळीनिमित्त नवं घरही घेतात. नुकतंच अभिनेत्री अनुजा साठे हिने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत घर खरेदी केलं.

अशातच आता आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं यंदाच्या दिवाळीत नवीन घर घेतलं आहे, ही अभिनेत्री सिया पाटील. मालिका आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सिया पाटीलनं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुण्यात नवीन घर घेतलं असून या घराची खास झलक तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सिया पाटील सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करीत असते. अशातच तिनं दिवाळीनिमित्त घेतलेल्या घराची झलकही सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. अभिनेत्रीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या नव्या घराच्या पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत.

सिया पाटीलनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमधून देवघर दाखवलं आहे. या फोटोसह तिनं ‘देवघर’, ‘नवीन घर’, ‘पुणे’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ असे हॅशटॅग दिले आहेत. नवीन घर घेतल्यानंतर स्वयंपाकघरात दूध उतू जाऊ देण्याची पद्धत असते, त्याची खास झलकही तिनं व्हिडीओद्वारे शेअर केली आहे; तर यावेळी अभिनेत्रीनं स्वत:च्या हातांनी नव्या घरात देवपूजा केली असल्याचंही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

यापुढे सियानं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या भव्य घराची झलक पाहायला मिळत आहे. या घरात प्रशस्त हॉल आहे. ठिकठिकाणी आकर्षक आशा विविध शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तसंच या घराला छोटीशी बाल्कनीसुद्धा आहे. एकूणच सियाने घेतलेलं हे नवीन घर खूपच छान आणि प्रशस्त असं आहे.

दरम्यान, सिया ही मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं ‘झक मारली बायको केली’, ‘चल गंमत करू’, ‘नवरा माझ्या बायकोचा’, ‘भागम भाग’, ‘बाप रे बाप’, ‘मोहन आवटे’, ‘धूम टू धमाल’, ‘गर्भ’, यांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत ती कार्यरत आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते.