Filmfare Marathi Awards 2025 : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२५’ हा सोहळा नुकताच पार पडला. यावर्षी सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ या दोन लोकप्रिय अभिनेत्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. याशिवाय मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते.
यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्याला सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या व्हायरल ‘शेकी’ गाण्याचा गायक संजू राठोडला देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. एप्रिल महिन्यात संजूचं ‘शेकी’ गाणं प्रदर्शित झालं होतं आणि अवघ्या दोन महिन्यात हे गाणं संपूर्ण जगभरात ट्रेंड होत आहे. नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला संजूच्या शेकी गाण्याची भुरळ पडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात संजू राठोडने ‘शेकी’ गाण्यावर विशेष सादरीकरण केलं. यावेळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींनी संजूच्या गाण्यावर ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत तसेच हुबेहूब हूकस्टेप करत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
अश्विनी भावे, मिताली मयेकर, प्राजक्ता माळी, वर्षा उसगांवकर, अमृता खानविलकर, स्मिता गोंदकर, प्रिया बापट, वैदेही परशुरामी या सगळ्या अभिनेत्रींनी संजूसह रंगमंचावर ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
यानंतर संजू प्रेक्षकांमध्ये पोहोचला आणि त्याने सई ताम्हणकरला डान्स करण्याची विनंती केली. यानंतर सई देखील ‘शेकी’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
संजूने सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर फिल्मफेअर सोहळ्यातील परफॉर्मन्सची झलक शेअर केली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, “अशीच प्रगती करून आयुष्यात खूप पुढे जा” अशा शुभेच्छाही संजू राठोडला दिल्या आहेत.
दरम्यान, संजूच्या शेकी गाण्याबद्दल सांगायचं झालं, तर या गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री ईशा मालवीय यात प्रमुख भूमिकेत झळकली आहे.