Marathi Celebrity Dance Video : सध्याच्या काळात अनेक नवनवीन गाणी सोशल मीडियामुळे चर्चेत येतात. तर, काही जुनी गाणी इन्स्टाग्राम रील्समुळे नव्याने ट्रेंड होतात. गेल्या काही दिवसांपासून ‘नटीनं मारली मिठी’ हे गाणं सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या टीमला सुद्धा या गाण्याची विशेष भुरळ पडली आहे. या कलाकारांचा डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.

‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यामध्ये प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या या नाटकाचे विविध ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. अलीकडेच हे सगळे कलाकार नाटकाच्या निमित्ताने कोकणात पोहोचले होते.

कोकणात जाऊन ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या टीमने ‘नटीनं मारली मिठी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. विशेष म्हणजे, या रील्स व्हिडीओमध्ये मुख्य कलाकारांना संपूर्ण बॅकस्टेज टीमने देखील साथ दिली आहे. त्यामुळे या व्हिडीओचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर हा डान्स व्हिडीओ शेअर करताना लिहितो, “फन इन कोकण… संपूर्ण बॅकस्टेज टीमबरोबर हा खास Reels व्हिडीओ… ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा यशस्वी Housefull दौरा चालूच आहे थाटामाटात, नक्की या तुमच्या जवळच्या नाट्यगृहात”

नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “ग्रेट शो…गोव्यात तुमचा प्रयोग पाहिला…खूप मजा आली”, “लय जोरात झाला डान्स”, “प्रसाद दादा एक नंबर”, “याला म्हणतात जीवनातील खरं सुख”, “प्रसाद दादा कमाल एक्स्प्रेशन”, “एक नंबर डान्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातून काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवाली परबची एक्झिट झाली. आता तिच्याऐवजी या नाटकात ‘बालक-पालक’ चित्रपटात झळकलेल्या भाग्यश्री मिलिंदची वर्णी लागली आहे.