Marathi Director Shares Story of Meeting Sunil Gavaskar : क्रिकेट विश्वात ‘लिटील मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणजे सुनील गावसकर. ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधारही होते. गेल्या दोन-तीन दशकांतील अनेक क्रिकेटप्रेमींचे ते आवडते क्रिकेटपटू आहेत आणि अनेकांसाठी देवही…त्यामुळे आयुष्यात त्यांना एकदा तरी भेटता यावं किंवा निदान पाहता तरी यावं, अशी इच्छा अनेक जण मनोमन व्यक्त करतात. अशीच एका लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाची सुनील गावसकरांना भेटण्याची इच्छा होती आणि ते दिग्दर्शक म्हणजे संजय जाधव. संजय जाधव हे दिग्दर्शक असण्याबरोबरच क्रिकेटरसिकही आहेत.

सुनील गावसकर हे त्यांच्यासाठी देव आहेत. त्यामुळे त्यांची सुनील गावसकर यांना एकदा तरी भेटण्याची इच्छा होती आणि एकेदिवशी त्यांची ही इच्छा नकळत पूर्ण झालीसुद्धा. त्याचाच एक खास किस्सा संजय जाधव यांनी सांगितला आहे.

‘व्हायफळ’ला दिलेल्या मुलाखतीत संजय जाधव हा किस्सा सांगत म्हणाले, “सुनील गावसकर म्हणजे माझ्यासाठी देव. मला लहानपणी स्वप्न पडायचं की, ते मला झोपेतून उठवत आहेत. त्यांच्याबरोबरचा माझा एक किस्सा आहे. माझं चेन्नईमध्ये शूटिंग सुरू होतं आणि तीन महिने शूटिंग केल्यानंतर मी मुंबईत येणार होतो. तेव्हा मी एकटाच होतो. बाकी युनिट नंतर येणार होतं.”

त्यानंतर ते सांगतात, “तेव्हा मला पोहोचायला उशीर झाला होता. मी चेक-इन करून, बोर्डिंग पास वगैरे घेऊन पोहोचलो. तेव्हा मला कळलं की, विमान थांबलं आहे आणि मला वाटलं की, ते माझ्यासाठीच थांबवलंय की काय… ही १०-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा बोर्डिंग पास काढला की, तुमच्यासाठी विमान थांबवायचे. मी घाईघाईत गेलो, तर विमान पूर्णपणे भरलेलं होतं आणि फक्त दोनच सीट्स रिकाम्या होत्या.”

संजय जाधव इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे संजय जाधव म्हणाले, “उशीर झाल्यानं माझ्यामुळेच विमान थांबलंय, असं वाटून मी गुपचूप मान खाली घालून गेलो आणि सीटवर बसलो. मी बसल्यानंतरही विमान थांबलेलंच होतं. मग कळलं की, विमान माझ्यासाठी थांबलेलं नाही. त्यानंतर ‘सर’ आले आणि ते थेट माझ्या बाजूलाच येऊन बसले. कारण- फक्त दोनच सीट्स होत्या., त्यापैकी एका सीटवर मी बसलो होतो आणि माझ्या बाजूच्या सीटवर येऊन ते बसले.”

पुढे संजय जाधव यांनी सांगितलं, “मी तेव्हा चेन्नई ते मुंबई जवळपास दोन तास गप्पपणे बसलो होतो. अनेक लोक त्यांच्याकडे येऊन सह्या घेत होते; पण माझी हिंमतच झाली नाही. खरं सांगतो… तेव्हा मी पाणीसुद्धा प्यायलो नाही. कारण- पाणी पिताना ते त्यांच्यावर सांडलं वगैरे तर… मी गप्प बसून होतो. माझा देव माझ्या बाजूला बसला होता. मला त्यांच्याबरोबर प्रवास करता आला ही माझ्यासाठी खूपच भारी गोष्ट आहे.”