एकीकडे ‘झिम्मा २’, ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’सारखे मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई जरी करत असले तरी असे बरेच मराठी चित्रपट आहेत जे प्रदर्शित कधी होतात अन् चित्रपटगृहातून कधी निघून जातात तेदेखील प्रेक्षकांना कळत नाही. आजही वर्षाला जर १० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले तर त्यापैकी दोन चित्रपटच बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात असा अंदाज बऱ्याच ट्रेड एक्स्पर्ट आणि निर्मात्यांनी मांडला आहे. मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात गर्दी करत नाही हे रडगाणं गेल्या काही वर्षांत आपण बऱ्याच कलाकारांच्या निर्मात्यांच्या तसेच दिग्दर्शकांच्या तोंडून ऐकले असेल.

आता मराठीतील अशाच एका लोकप्रिय दिग्दर्शकाने यावर भाष्य केलं आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत विजू माने यांचं नाव आघाडीवर आहे. ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘स्ट्रगलर साला’ या त्यांच्या सीरिजमुळे ते सर्वाधिक चर्चेत असतात. नुकतंच विजू माने यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्रम्हणे’ या यूट्यूबवरील पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली अन् मराठी चित्रपट नेमका का चालत नाही याबद्दल सविस्तर भाष्य केलं.

आणखी वाचा : “मला अशा चित्रपटात काम..” अभिनेत्री हुमा कुरेशीने केलं रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चं कौतुक

विजू म्हणाले, “मराठी मनोरंजनक्षेत्रातील बऱ्याच मंडळींना वाटतं की आम्ही फार भारी सिनेमा केला आहे. पण आपल्या कंटेंटमध्ये प्रेक्षकाला कॉलरला धरून चित्रपटगृहात खेचून आणण्याएवढी ताकद आहे का? आपण तेवढी मेहनत स्क्रिप्ट लिहिण्यापासून घेतली आहे का? तर तसं अजिबात नसतं अन् मी हे शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो. मी मराठी प्रेक्षकांना कधीही दोष देणार नाही, मराठी प्रेक्षक हा अत्यंत सुजाण आहे. जर ‘पांडू हवालदार’सारखा चित्रपट चालतो, तर ‘झिम्मा’देखील चालतो, तर ‘वेड’सारखा चित्रपटही चालतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे याबद्दलच विजू माने म्हणाले, “वेडसाठी रितेश देशमुखांनी काय मराठी माणसं किंवा प्रेक्षक शोधून आणला का? आशयघनता आणि आशयातील गांभीर्य याच्यात आपल्या मराठी सिनेमा हरवून गेला आहे. जर इंडस्ट्रीमध्ये एक अनुराग कश्यप आहे तर तिथेच एक रोहित शेट्टीदेखील असणं अनिवार्य आहे. आपल्याकडे ९९ अनुराग कश्यप झाले आहेत अन् त्याच्यातून एखाद दूसरा रोहित शेट्टी त्याचा प्रेक्षकवर्ग शोधत असतो.” याबरोबरच या मुलाखतीमध्ये विजू माने यांनी मराठी चित्रपटसृष्टीबद्दल, व्यवसायाबद्दल तसेच मराठी कलाकारांबद्दलही भाष्य केलं.