केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची मध्यवर्ती भूमिका असलेल्या चित्रपटाची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेक कलाकारांसह नेटकरी चित्रपटाचं कौतुक करत आहे. या चित्रपटात झळकलेले मिलिंद गवळी यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करून खास पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद गवळींनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील दृश्य दादर येथील प्लाझा चित्रपटगृहातील आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक ‘झापुक झुपूक’ चित्रपटातील गाण्यांवर जबदरस्त थिरकताना पाहायला मिळत आहेत. याचा अनुभव मिलिंद गवळींनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंद यांनी लिहिलं, “‘झापुक झुपूक’ चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांची भरपूर करमणूक करतो आहे. प्रेक्षकांना निखळ आनंद देतो आहे. काल, ( २५ एप्रिल ) मी माझ्या कुटुंबाबरोबर प्लाझा चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला आणि एक वेगळाच चित्रपटगृहाचा अनुभव घेऊन घरी आलो.”

“चित्रपटाचा उद्देशच प्रेक्षकांना तीन तास त्यांच्या आयुष्यातले दुःख, यातना, वेदना विसरून वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाण्याचं काम असतं आणि ज्या चित्रपटांमध्ये धमाल संगीत असेल, धमाल नृत्य असेल, मग तर काय बोलायलाच नको. उत्कृष्ट संगीत चित्रपटगृहाच्या डॉल्बी डिजिटल ७.१ साउंड सिस्टीमवर अनुभवायला मिळत असेल तर तो एक वेगळाच आनंद प्रेक्षकांना देऊन जातो, आमच्या या चित्रपटांमधली गाणी तीन वेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी केलेली आहेत, जी प्रेक्षकांना थिरकायला, अनुभवायला लावतात. गाणं सुरू झालं की प्रेक्षक उठून नाचायला लागायचे, जे दाक्षिणात्य चित्रपट मधल्या गाण्यावर आपल्याला नेहमीच बघायला मिळतं, ‘ऊ अंटावा’, ‘सामे’, ‘श्रीवल्ली’, ‘मुंबई की रानो’ आता त्यामध्ये माझ्या चित्रपटाच्या गाण्याचा समावेश झाला आहे. पट्टया द डॉग नी गायलेलं, क्रिटिक्सने संगीत दिलेलं ‘मी बोलताना गोलीगत , झापुक झुपूक’, त्याचबरोबर चंदन कांबळे यांचं ‘वाजीव दादा’ चित्रपटगृहामध्ये हायदोस घालतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो आहे. तो ‘सैराट’च्या गाण्यांच्या वेळेला बघायला मिळाला होता,” असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

तसंच पुढे मिलिंद गवळींनी लिहिलं की, तरुण मुलांमध्ये खूप एनर्जी असते, आणि ती channelise करणं गरजेचं असतं, आणि ते बऱ्यापैकी संगीत माध्यमं करत असतात. संगीत माणसाला आयुष्य celebrate करायला शिकवत असतं, आपल्याला जे गाणं आवडतं त्या गाण्यावर तर आपण Inhibitions न ठेवता मनसोक्त नाचलो, आयुष्यातला खूप ताण कमी होईल आणि त्यासाठी डान्सर असायची गरज नसते. आमचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट एकदा चित्रपटगृहात जाऊन बघून या..

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच या चित्रपटातील नवीन गाणं ‘वाजीव दादा’ हे प्रदर्शित झालं. ज्यामध्ये सूरजसह जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे, वैभव चव्हाण आणि इरिना पाहायला मिळत आहेत.