सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. याबद्दल अनेक कलाकार, नेते, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत.
नितीन देसाई यांनी आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट, मालिकांचं कला दिग्दर्शन केलं आहे. या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचं अनेक कलाकारांशी खूप चांगलं नातं तयार झालं. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. आता त्यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : “त्याने बोलायला हवं होतं…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया
मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर त्यांचा आणि नितीन देसाई यांचा एक बिहाइंड द सीन फोटो शेअर करत लिहिलं, “दादांचं आणि माझं नातं या फोटोमध्ये दिसतंय अगदी तसंच होतं ! त्यांनी निर्माण केलेल्या ‘राजा शिवछत्रपती’मध्ये जिजाबाई साहेबांची भूमिका पहिल्यांदा केली आणि त्यानंतर ‘रमा माधव’च्या दिग्दर्शनाच्या वेळेला ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अतिशय गुणी असा मनस्वी कलावंत, कोणत्याही संकटात न डगमगणारा माणूस…फार मोठा धक्का…”

हेही वाचा : “काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात तो…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर सुबोध भावेची प्रतिक्रिया
आता मृणाल कुलकर्णी यांची ही पोस्ट चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत नेटकरी दुःख व्यक्त करत आहेत.