Mrunmayee Deshpande on title of film: सध्या अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आज १० ऑक्टोबरला मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्रीने या चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच त्याची कथादेखील लिहिली आहे.

काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. ट्रेलरलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाची टीम विविध ठिकाणी प्रमोशनला जात असल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान कलाकारांनी अनेक गमतीजमती, किस्से सांगितले.

अशातच चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाला होता. तसेच, चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यासाठी याचिका दाखल केली गेली होती. आता मृण्मयीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “माननीय उच्च न्यायालयाने मनाचे श्लोक या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठीच्या केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही ‘मना’चे श्लोक चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो.”

“आता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी स्वत:च्या पायांवर भक्कमपणे…”

पुढे तिने लिहिले, “पाच महिन्यांपासून आम्ही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत करीत आहोत. मनाचे श्लोक नावाचा चित्रपट येत असल्याचे सर्वांनाच खूप आधीपासून माहीत होते. मात्र, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासून सोशल मीडियावर नावाबाबत विरोधाचे मेसेजेस फिरू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे संपू्र्ण टीमला अनावश्यक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.”

मृण्मयीने पुढे लिहिले, “घटनांचा क्रम पाहता हे सर्व पूर्वनियोजित असावे, अशी शंका येते आणि हे दुर्दैवी आहे. चित्रपटामध्ये रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या कुठल्याही श्लोकाचा उल्लेखसुद्धा नाही. ‘मना’चे श्लोक हे शीर्षक चित्रपटातील नायिका व नायक म्हणजेच मनवा व श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे. आम्ही सर्व जण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही या नावाशी प्रामाणिक आहोत. आता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी स्वत:च्या पायांवर भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, अशा कौटुंबिक सिनेमाचं स्वागत करण्याऐवजी कुठलीही माहिती न घेता, सर्वांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात आले, हे निराशाजनक आहे.”

न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याचे म्हणत मृण्मयीने लिहिले, “अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की, जसे तुम्ही याआधी आम्हाला प्रेम दिले, तसेच यावेळीही चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावे आणि मनामध्ये कोणताही किंतु-परंतु न आणता, या सिनेमाला आशीर्वाद आणि भरघोस प्रतिसाद द्यावा. तुमचीच टीम ‘मना’चे श्लोक”, असे लिहित अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करीत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, अशी आशादेखील व्यक्त केली आहे.