Mrunmayee Deshpande Movie Tu Bol Na : ‘मना’चे श्लोक हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. मात्र, या सिनेमाच्या नावावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. न्यायालयाच्या परवानगीनंतरही या सिनेमाचे दोन शो पुण्यात बंद पाडण्यात आले होते. यामुळे मृण्मयीने ‘मना’चे श्लोक चित्रपटाचं प्रदर्शन थांबवून हा सिनेमा नव्या नावासह लवकरच प्रदर्शित केला जाईल असं चाहत्यांना सांगितलं होतं.
आता मृण्मयीने ‘मना’चे श्लोक या सिनेमाचं नाव बदलून ‘तू बोल ना’ असं ठेवलं आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीने सर्व चाहत्यांना विशेष आवाहन केलं आहे.
मृण्मयी देशपांडे म्हणते, “नमस्कार मंडळी आमचा ‘तू बोल ना’ हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येत आहे आणि या सिनेमाचं अॅडव्हान्स बूकिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही तातडीने बूक माय शोवरती जा आणि थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहा. तुम्हा सर्वांना भेटायला जास्तीत जास्त ठिकाणी आमची सगळी टीम येणार आहे. थिएटरमध्ये या…सिनेमा पाहा आणि मग ‘तू बोल ना’ भेटुयात!”
मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सिनेमाचे शो बंद पाडण्यात आल्यावर संपूर्ण मराठी कलाविश्वातील कलाकार मृण्मयीला पाठिंबा देण्यासाठी एकवटले होते.
‘तू बोल ना’ या सिनेमाचं दिग्दर्शन मृण्मयी देशपांडेने केलं असून या चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. यामध्ये मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.