अभिनेते व खासदार अमोल कोल्हे नेहमीच राजकीय तसेच सामाजिक विषयांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस शाखेवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये अमोल कोल्हेंनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. याप्रकरणी आता मुंबई वाहतूक पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने एक्स (आधीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. “मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या १.३१ कोटींपेक्षा अधिक ई-चलानधील ६८५ कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम १ जानेवारी २०१९ पासून प्रलंबित आहे. ही दंडनीय रक्कम शासनजमा करण्यासाठी व वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी दर शनिवार व रविवारी दंड वसुलीची मोहीम हाती घेण्यात येते. ” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : “महिला पोलिसांनी गाडी अडवली अन्…”, अमोल कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाले, “ट्रिपल इंजिन…”

तसेच “अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करण्यापूर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते.” असंही पोलिसांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : Video : नव्या घरापाठोपाठ प्रार्थना बेहेरेने मुंबईत घेतलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह जोडीने केली पूजा, पाहा व्हिडीओ

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतून प्रवास करताना वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी अमोल कोल्हेंची गाडी अडवली त्यानंतर त्यांच्या वाहनचालकास दंड भरण्यास सांगितलं होतं. यावर “मी स्वतः हा काय प्रकार आहे याची माहिती घेतली. यावेळी त्या भगिनीने थेट तिच्या मोबाईलवरील मेसेजच दाखवला प्रत्येक चौकात २५ हजार रूपयांची वसुली आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं ‘टारगेट’ या भगिनींना देण्यात आलेलं दिसलं.” असा दावा करत अमोल कोल्हेंनी केला होता. तसेच याबाबत जनतेला माहिती मिळायलाच हवी. अशी मागणी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे केली होती.