Treesha Thosar Won National Award : राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. हा सोहळ्यानंतर सर्वत्र बालकलाकार त्रिशा ठोसरची चर्चा होऊ लागली आहे. अवघ्या ६ वर्षांची त्रिशा चक्क साडी नेसून या सोहळ्याला पोहोचली होती. इतक्या लहान वयात कमालीच्या आत्मविश्वासाने ती मंचावर पुरस्कार स्वीकारायला गेल्याचं पाहून उपस्थित प्रेक्षक सुद्धा भारावले. सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर त्रिशाने एएनआयशी संवाद साधला. “तुला आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय, कसं वाटतंय?” या प्रश्नावर त्रिशा म्हणते, “मला खूप छान वाटलं” तिला पुढे विचारलं, “जेव्हा तू मंचावर आपल्या राष्ट्रपतींना भेटलीस तेव्हा तुला त्या काय म्हणाल्या?” त्यांनी जवळ घेऊन माझं अभिनंदन केलं, मला खूप छान वाटतंय. असं उत्तर त्रिशाने दिलं.

या सोहळ्याला त्रिशा सुंदर साडी नेसून पोहोचली होती. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी किती दिवस आधी सगळी तयारी केली होती असं विचारताच त्रिशाने फक्त १ दिवस आधी सगळी तयारी केली होती असं उत्तर दिलं आहे.

त्रिशा वयाने लहान असल्याने तिचं सोशल मीडिया अकाऊंट तिचे आई-बाबा हँडल करतात. राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर तिच्या पालकांनी त्रिशाच्या भावना पोस्टच्या रुपात इन्स्टाग्रामवर मांडल्या आहेत.

त्रिशा ठोसरची पोस्ट

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मला इतका मोठा सन्मान मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे. मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेले तेव्हा संपूर्ण सभागृहाने माझं कौतुक केलं. टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. माझे आई-वडील, आजी-आजोबा प्रचंड खूश झाले होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मी नेमकं काय साध्य केलंय हे मला सुद्धा माहिती नाही. पण, मला इतकंच माहितीये की या पुरस्कारमुळे मी माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या कुटुंबाचं नाव उंचावलं आहे. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे गेल्या ७० वर्षांत हा सन्मान मिळवणारी मी सर्वात लहान बालकलाकार आहे.

माझ्या या यशात आई-बाबांचा, माझ्या कुटुंबाचा, चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा, या भूमिकेसाठी माझी निवड करणारे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. माझी या पुरस्कारासाठी निवड करणारे मान्यवर ज्युरी सदस्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी साकारलेल्या चिमी या पात्रावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक या सगळ्यांची मी आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच मी इतक्या लहान वयात या स्थानावर पोहोचू शकले. तुमचं प्रेम आणि पाठिंबा कायम माझ्याबरोबर राहूदेच हीच देवाकडे प्रार्थना. मी भविष्यातही असंच काम करण्याचा प्रयत्न करेन.

दरम्यान, त्रिशावर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ही चिमुकली आता महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात झळकणार आहे.