भरत जाधव हे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. परंतु, भरत जाधव नेहमीच निवडक भूमिका साकारताना दिसतात. त्यांनी आजवर काम केलेल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकताच त्यांचा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील त्यांच्या भूमिकेचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं, म्हणूनच मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून ते ओळखले जातात आणि यामुळेच ते इंडस्ट्रीत अनेकांचे आदर्श आहेत. अशातच अभिनेता निखिल चव्हाणने भरत जाधव यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेता निखिल चव्हाणने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना भरत जाधव यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. निखिलने भरत जाधव यांच्याबरोबर ‘धोंडी चंप्या’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याचा अनुभव सांगताना निखिल म्हणाला, “भरत सरांसारखी व्यक्ती या चित्रपटामुळे माझ्या आयुष्यामध्ये आली. लोक म्हणतात की ते शाहरुख खानचे फॅन आहेत वगैरे, पण आम्ही मराठी मुलं आहोत, आम्ही भरत सरांचे चित्रपट बघून मोठे झालेले आहोत. ‘जत्रा’, ‘दामोदर पंत’ हे चित्रपट बघत मोठी झालेली माणसं आहोत.”
“मी जेव्हा संघर्ष करत होतो आणि सगळे नकार पचवत होतो तेव्हा मी भरत सरांचं ‘सही रे सही’ नाटक बघायचो आणि तिथून मला एक उर्जा मिळायची; की काहीतरी होइल, काहीतरी मिळेल आणि नंतर त्याच माणसाबरोबर स्क्रिन शेअर करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” यावेळी त्याला “तू भरत सरांबरोबर काम केलेलं आहे, यादरम्यान तुला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर निखिल म्हणाला, “आम्ही दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आयुष्याचा प्रवास कसा असावा, त्यामध्ये काय काय होतं, त्या गोष्टी कशा पचवायच्या, गोष्टींचा समतोल कसा साधायचा; अशा असंख्य गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून तुम्ही कसं राहिलं पाहिजं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं.”
दरम्यान, निखिल चव्हाणबद्दल बोलायचं झालं तर तो पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आला ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालकेतून. यामध्ये त्याने भारतीय फौजीची भूमिका साकारली होती. यानंतर तो ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत झळकला. मालिकांव्यतिरिक्त निखिलने ‘गर्ल्स’, ‘अॅट्रॉसिटी’, ‘वीरगती’,’डार्लिंग डार्लिंग’, ‘लंडन मिसळ’, ‘धोंडी चंप्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.