निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके निळू फुले. ज्यांनी चार दशकांहून अधिक काळ मराठी मनोरंजनविश्वावर अधिराज्य गाजवलं. करारी आवाज व त्यांच्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. निळू फुलेंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या होत्या. रुपेरी पडद्याप्रमाणे त्यांनी रंगभूमीही गाजवली. अभिनय क्षेत्राप्रमाणे ते सामाजिक कार्यातदेखील तेवढेच सक्रिय होते. जुलै २००९ मध्ये निळू फुले यांचं निधन झालं. त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
काही वर्षांपूर्वी निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. वडिलांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास त्यांनी खूपच जवळून पाहिलाय. निळू फुले यांचं सामाजिक कार्य, त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा खूप मोठा आहे त्यामुळेच लवकरच गार्गी फुले व प्रसाद ओक एकत्र येऊन निळू फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमात निळू फुले यांच्या जीवनातील विविध टप्पे उलगडण्यात येणार आहेत. अलीकडेच ‘वास्तव कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले यांनी या सिनेमाबद्दल खुलासा केला. याशिवाय अभिनेत्रीने सर्वांना त्यांच्या बालपणीची एक आठवण सांगितली आहे.
गार्गी फुले बालपणी जेव्हा वडिलांचे सिनेमे पाहायच्या तेव्हा त्या खूप रडायच्या. याबद्दल अभिनेत्री सांगतात, “बाबाची प्रत्येक चित्रपटात खलनायकी भूमिका असायची आणि व्हिलन असल्यामुळे प्रत्येक सिनेमात त्याची भूमिका किंवा त्याचं जे पात्र असायचं ते मरायचं…म्हणजेच मृत्यूचा सीन असायचा. तो मृत्यूचा सीन पाहून मी लहानपणी प्रचंड रडायचे, अगदी भोकाड पसरायचे. कारण, माझा बाबा माझ्यासाठी जीव की प्राण होता. त्याचं आणि माझं ट्युनिंग, आमचं बॉण्डिंग फार छान होतं. त्यामुळे ते चित्रपट पाहून मी वेड्यासारखी रडायचे.”
“आता त्यावेळी मोबाइल फोन वगैरे पण नव्हते. मग मी रडायला लागल्यावर माझी आई ट्रंक कॉल लावायची. मग बाबाशी बोलणं झाल्यावर, त्याचं समोरून हॅलो ऐकू आल्यावर मी शांत व्हायचे. माझा बाबा जिवंत आहे, त्याला काहीही झालेलं हे समजल्यावर माझं समाधान व्हायचं, मी आनंदी व्हायचे. तो समोरून मला सांगायचं मी येणार आहे…मला काहीही झालेलं नाही…मी काही मेलो वगैरे नाहीये. असे अनेक गमतीशीर प्रसंग घडायचे.” असं गार्गी फुले यांनी सांगितलं.
दरम्यान, गार्गी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायंच झालं, तर त्यांनी आजवर ‘तुला पाहाते रे’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘इंद्रायणी’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.