महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली वर्षानुवर्षे अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

२७ मे रोजी हा सोहळा नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी निवेदिता देखील उपस्थित होत्या. पतीला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर निवेदिता यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथील फोटो शेअर करत निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

“हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा… तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक टप्पा साक्षी आहे तुझ्या मेहनतीचा, तुझ्या समर्पणाचा. माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान! माझा अभिमान अनंत पटीने वाढला!! खूप खूप अभिनंदन…अशोक” अशी पोस्ट शेअर करत निवेदिता यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर निवेदिता माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या होत्या, “अशोकने त्याच्या सगळ्या प्रेक्षकांना नेहमीच देवासमान मानलंय. त्याला कामापुढे कधीच काही दिसलं नाही, कधी पैसे कमावणं हे देखील उद्दिष्ट नव्हतं. मी जगात काहीही करू शकतो पण, माझ्या प्रेक्षकांना मी कधीच फसवू शकत नाही. असं ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे एवढी वर्षे त्यांनी केवळ प्रामाणिकपणे आपलं काम केलं. भूमिका छोटी असो, मोठी असो त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे सर्व केलं. महाराष्ट्र भूषण आमच्यासाठी विशेष आहेच आणि आता त्यांना पद्मश्री मिळाला आहे, म्हणून मी खरंच खूप आनंदी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदा राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस. जयशंकर, प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.