१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेनिमित्त अनेक जण आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांचाही यामध्ये समावेश आहे. या सगळ्यात अभिनेत्री उर्मिला कोठारे(Urmila Kothare)ने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. उर्मिला कोठारे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा ती व्हिडीओ शेअर करते. आता मात्र व्हॅलेंटाइन डे निमित्ताने उर्मिला कोठारेने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री काय म्हणाली?

उर्मिला कोठारेने शेअर केलेला हा व्हिडीओ दुसऱ्या-तिसऱ्या कोणाबरोबरचा नसून तिच्या मुलीबरोबरचा आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, उर्मिला कोठारेची मुलगी जिजा घोडेस्वारी करत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत अभिनेत्रीने लिहिले, या व्हॅलेंटाइन डेला माझ्या प्रिय व्यक्तीबरोबर प्रेम व्यक्त करीत आहे. माझी मुलगी जिजाचा घोडेस्वारीदरम्यानचा हा व्हिडीओ एक आठवणीतील सुंदर क्षण आहे. हा आमचा खास क्षण असून आमच्यातील हे बॉण्डिंग कायमस्वरूपी आहे, असे लिहित अभिनेत्रीने हार्ट इमोजी शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी “छान”, “सुंदर” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उर्मिला कोठारे काही दिवसांपूर्वीच तिच्या झालेल्या गाडीच्या अपघातामुळे चर्चेत आली होती. तिच्या गाडीने दोन मजुरांना धडक दिली होती, यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. ही गाडी तिचा ड्रायव्हर चालवत होता. या अपघातात ड्रायव्हरसह अभिनेत्रीला दुखापत झाली होती. या घटनेनंतर अभिनेत्रीने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती अभिनेत्रीने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

उर्मिला कोठारेच्या कामाविषयी बोलायचे तर अभिनेत्रीची प्रमुख भूमिका असलेला ‘काकण’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात तिच्याबरोबर जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत होते. याबरोबरच, ‘दुनियादारी’ चित्रपटातदेखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. ‘शुभ मंगल सावधान’, ‘मला आई व्हायचंय’, अशा चित्रपटांतही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसली आहे. याबरोबरच, अभिनेत्रीने मराठी-हिंदी मालिकेत काम केले आहे. ‘मायका’, ‘मेरा ससुराल’, ‘असंभव’, ‘ऊन-पाऊस’, ‘गोष्ट एका लग्नाची’ या मालिकेत तिने काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री उर्मिला कोठारेने आदिनाथ कोठारेबरोबर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांना जिजा ही मुलगी आहे.