Suraj Chavan & Pandharinath Kamble : सध्या ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण ‘झापुक झुपूक’ सिनेमामुळे चर्चेत आहे. हा मुख्य हिरो म्हणून त्याचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. ‘झापुक झुपूक’ला सध्या म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. अनेकांनी सूरजला ट्रोल देखील केलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी सूरजच्या सिनेमाची ठरवून नकारात्मक प्रसिद्धी केल्याचा दावा देखील केदार शिंदेंकडून इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये करण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सूरज प्रचंड नाराज असल्याचंही ते म्हणाले होते.

केदार शिंदे यांनी घेतलेल्या इन्स्टाग्राम लाइव्ह सेशननंतर सूरजला अनेक इन्फ्लुएन्सर्सनी पाठिंबा दिला आहे. सूरजचे ‘बिग बॉस मराठी’चे सहकलाकार देखील त्याला सपोर्ट करत आहेत. शोमध्ये सूरजने पंढरीनाथ कांबळे यांना मोठा भाऊ मानलं होतं. खचलेल्या सूरजची समजूत काढण्यासाठी त्याच्या लाडक्या पॅडी दादांनी त्याला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी सूरज गावच्या मंदिरात बसला होता. पंढरीनाथ कांबळे सूरजला काय म्हणाले जाणून घेऊयात…

पंढरीनाथ कांबळेंनी काढली सूरजची समजूत…

पंढरीनाथ कांबळे : मी केदार सर आणि तुझं लाइव्ह पाहिलं. हे सुरुवातीच्या दिवसांत सर्वांना सहन करावं लागलं आहे. त्यामुळे बाळा, तू एवढी काळजी करू नकोस.

सूरज : माझं खरंच काही चुकलंय का? एवढं मला सांगा ना…

पंढरीनाथ कांबळे : नाही नाही…हे बघ सूरज बोलणाऱ्यांची आपण तोंडं धरू शकत नाही, काही लोकांना अशा संधी मिळत नाहीत. तुला तुझ्या नशिबाने इथपर्यंत आणलेलं आहे. तर, लोक असेच जळत राहणार, बोलत राहणार…त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही.

सूरज : पॅडी दादा…माझं इतकंच म्हणणं आहे की, चित्रपट बघा आणि बोला. माझी खरंच यात काहीच चूक नाहीये. चित्रपट न पाहता मला नावं ठेवत आहेत.

पंढरीनाथ कांबळे : हे बघ सिद्धार्थ जाधव आणि अगदी मला स्वत:ला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. मला कितीजण कसा दिसतो वगैरे बोलले आहेत. हातातोंडाशी आलेल्या भूमिका माझ्या हातून गेलेल्या आहेत. त्यामुळे असं वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण आयुष्यात नेहमी जिद्दी राहायचं आणि आपलं काम करायचं. त्यामुळे बोलणारे लोक बोलत राहतील आणि एका क्षणाला बोलून-बोलून कंटाळतील. शेवटी त्यांना गोष्टी स्वीकाराव्या लागतील. आज तुला अनेकजण बोलत असतील पण, उद्या तेच लोक तुला येऊन सॉरी म्हणतील. तुला ट्रोल केलं त्याबद्दल माफी मागतील. माझे शब्द लिहून ठेव बघ तू…काही दिवसांनी परिस्थिती बदलेल. ज्या लोकांनी सिनेमा पाहिलाय त्यांनी खरंच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी अनेक सकारात्मक कमेंट्स वाचल्या आहेत. तू नेहमी चांगलं कर्म केलंस म्हणून देवाने तुला ही संधी दिली आहे. काही लोकांना हे बघवत नाहीये…पण तू उत्तम काम केलेलं आहेस. मी मनापासून कळकळीने एवढंच सांगेन…कृपा करून एखाद्या सिनेमाबद्दल प्रत्यक्ष न बघता बोलू नका. आधी बघा आणि चित्रपट नाही आवडला तर नक्की बोला.
मी याबद्दल अंकिता आणि माझ्या लेकीशी पण बोललो. एकतर एवढ्या मोठ्या स्क्रीनवर येणं, तुमचं पोस्टर लागणं ही मोठी गोष्ट आहे. यामागे तुझी मेहनत आहे पण, या कलेक्शन वगैरे सगळ्यात नशिबाचा देखील भाग असतो. खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर तू सध्या झळकत आहेस. माझ्या भावाचं, माझ्या पोराचं कौतुक होतंय हे पाहून छान वाटत आहे आणि तुला ट्रोल करणाऱ्यांना तुझं चांगलं होतंय हे पाहणं जमत नाहीये…म्हणून ते काहीही बोलतात. सुरुवातीचे दिवस खडतर जातील पण नंतर फक्त आनंद आणि जल्लोष आहे. काळजी करू नकोस.

सूरज : तुमचा आशीर्वाद कायम ठेवा…

पंढरीनाथ कांबळे : अरे मुलगा आहेस तू माझा…तुला कायम आशीर्वाद आहेत.

दरम्यान, सूरज चव्हाणने या संभाषणाचा खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या लाडक्या पॅडी दादांचे आभार मानले आहेत. “पॅडी दादा, कायम माझ्याबरोबर राहा…तुमच्याकडून खूप गोष्टी शिकायच्या आहेत. मला आधार मिळाला” असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर, नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.