Prajakta Koli Debut In Marathi : ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘बघतोस काय मुजरा कर’ यांसारखे अनेक हिट चित्रपट देणारा लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणजे हेमंत ढोमे. त्याच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. अशातच हेमंत आता त्याचा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा सिनेमा म्हणजे ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’. ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी त्याने या आगामी सिनेमाची घोषणा केली होती.

हेमंतने त्याच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमाची घोषणा केल्यापासूनच अनेकांना या सिनेमाविषयीची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे आणि या पोस्टरवरून सिनेमात कोण कोण कलाकार असणार? हे समोर आलं आहे. पहिल्या पोस्टरमधून या कलाकारांचे चेहरे दिसत नसले तरी या सिनेमात नावाजलेले चेहरे आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या सिनेमाच्या दुसऱ्या पोस्टरवर कलाकारांची नावे देण्यात आली आहेत. हेमंतच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असतील.

तसंच ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता कोळी ही पहिल्यांदाच मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरवर तिचं हे नाव पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

प्राजक्ताने याआधी २०२० मध्ये आलेली शॉर्ट फिल्स ‘खयाली पुलाव’ मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच्ड’ या सीरिजमधील अभिनयाने तिने आपल्या अभिनयाकडे सर्वांचचं लक्ष वेधलं.२०२२ मध्ये चित्रपट ‘जुग जुग जिओ’ मध्ये अनिल कपूर,नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा आडवाणीबरोबर काम केले. आता ती पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे.  

मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मातृभाषेतून होणारी जडणघडण.. यावर आधारित हा सिनेमा आहे. अलिबाग आणि आसपासच्या भागात या सिनेमाचं चित्रीकरण पार पडलं आहे. चित्रीकरण पार पडल्यानंतर आता हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्राजक्ता कोळी इन्स्टाग्राम पोस्ट

या सिनेमाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, “माझे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं आणि आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे, त्याचं चित्रीकरण मला याच भागात करता आलं याचा प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला होता आणि आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. माझ्याबरोबर असलेले हे सर्व कलाकार आणि माझी संपूर्ण टीम, या चित्रपटाची खरी ताकद आहेत.”

क्षिती जोगच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटांचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमेनच केलं आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.