Prajakta Mali Shared A Post As Phullwanti completes one year : मराठी सिनेसृष्टीत अलीकडे अनेक उत्कृष्ट कथानक असलेले चित्रपट प्रदर्शित झाले. यातील एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला ‘फुलवंती’ हा सिनेमा. अशातच आता ‘फुलवंती’ला प्रदर्शित होऊन एक वर्ष झाल्यानिमित्त प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर मालिका, चित्रपटांमधून ती विविध भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सूत्रसंचालिका म्हणूनही नावारूपाला आली. प्राजक्ता अभिनेत्री असण्याबरोबरच व्यावसायिका आणि निर्मातीसुद्धा आहे. ‘फुलवंती’ हा तिची निर्मिती असलेला पहिला चित्रपट आहे, त्यामुळे तो प्राजक्तासाठी अजून खास ठरतो.
‘फुलवंती’मध्ये प्राजक्ताबरोबर अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेतून झळकलेला. यातील फुलवंती व शास्त्रीबुवा यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांची मनं जिंकली. त्यांच्याबरोबर या चित्रपटात अनेक लोकप्रिय मराठी कलाकार झळकले; तर यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहल तरडे हिने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं. ‘फुलवंती’ हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेला आणि आज ११ ऑक्टोबर २०२५ ला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्तानेच प्राजक्ताने पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ता माळीची भावुक पोस्ट
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याला मोठी कॅप्शन दिल्याचं दिसतं. यामधून तिने म्हटलं की, “यंदाचे जवळपास सर्व पुरस्कार जिनं मिळवून दिले, त्या ‘फुलवंती’च्या प्रदर्शनाला आज एक वर्ष पूर्णं झालं… देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात आलीस… ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी तो नक्की पाहा. सौंदर्य आणि कलेची अनभिषिक्त सम्राज्ञी फुलवंती, तर दुसरीकडे विद्याविभूषित प्रकांडपंडित शास्त्रीबुवा यांच्यामधील संघर्षाला आज एक वर्षं पूर्ण झालं.”
प्राजक्ताने कॅप्शनमधून हा चित्रपट प्रेक्षक ‘प्राईम व्हिडीओ’वर आणि ‘झी ५’ वर पाहू शकतात असंही सांगितलं आहे. ‘फुलवंती’ चित्रपटातील गाणी, नृत्य, कथानक या सगळ्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठ्या संख्येने हजेरी लावलेली. प्राजक्ताने उल्लेख केल्यानुसार या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.