सध्या हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस आले आहेत. रितेश देशमुखचा ‘वेड’ अन् पाठोपाठ केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याबरोबरीनेच ‘घर बंदुक बिर्याणी’ अन् ‘वाळवी’सारख्या चित्रपटांनीही सवयीप्रमाणे प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. आता असाच एक आणखी आगळा वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्याचं नाव आहे ‘तीन अडकून सीताराम’.
अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट त्याच्या नावामुळे चांगलाच चर्चेत आहे. पाहायला गेलं तर हा एक अत्यंत वेगळ्या धाटणीचा एक धमाल चित्रपट आहे, परंतु चित्रपटाचं हे असं वेगळं आणि हटके नाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा : ‘तीन अडकून सीताराम’चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा
ट्रेलरमध्ये आपल्याला तीन अतरंगी मित्र अन् त्यापैकी एकाची गर्लफ्रेंड यांची भन्नाट गोष्ट पाहायला मिळणार आहे. हे तीन मित्र लंडनमध्ये एका अडचणीत सापडले आहेत, अन् यातून बाहेर पडण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत पण प्रत्येकवेळी त्यांची अडचण वाढतानाच दिसत आहे. ट्रेलरवरुन हा एक ‘ब्लॅक कॉमेडी’ चित्रपट असेल असा अंदाज आपण लावू शकतो. दिग्दर्शक हृषिकेश जोशी हे या चित्रपटात खलनायकाच्या हटके भूमिकेत दिसत आहेत.
चित्रपटातील संवाद अन् विनोद हे प्रासंगिक आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. ट्रेलरवरुन हा चित्रपट प्रचंड मजेशीर असणार आहे हे स्पष्ट झालं आहे. याबरोबरच या चित्रपटाच्या कथेची उत्सुकता ताणून ठेवण्यात निर्मात्यांना यश मिळालं आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे व हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २९ सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.