Prasad Oak Shares Experience of US tour: अभिनेता प्रसाद ओक काही दिवसांपूर्वीच ‘गुलकंद’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच अभिनेत्याच्या भूमिकेचे कौतुकदेखील झाले.
प्रसाद ओकने ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाच्या अमेरिका दौऱ्याचा सांगितला अनुभव
प्रसाद ओक अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही काम करतो. चित्रपटांबरोबरच तो नाटकातही अभिनय करताना दिसतो. आता काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या पत्नीसह म्हणजे मंजिरी ओक यांच्यासह यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. आता त्याने शेअर केलेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये अमेरिकेत ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान काय अनुभव आले हे सांगितले आहे.
प्रसाद ओक म्हणाला, “‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक अमेरिकेत घेऊन जाणं प्रचंड अवघड होतं, कारण या नाटकाचा सेट खूप मोठा आहे. पण, अमेरिकेतील शैलेश शेटे या माणसामुळे हे शक्य झालं आहे. ही व्यक्ती पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यावर सलग २२ तास प्रवास करत नाटकाच्या सेटचा ट्रक घेऊन आली होती. याच व्यक्तीमुळे हा दौरा आम्ही करू शकलो, नाहीतर हा दौरा यशस्वी होणं खरंच खूप अवघड होतं.
“अमेरिकेत गेल्यानंतर प्रत्येक शहरात आमचं मराठमोळ्या पद्धतीने आरती ओवाळून खूप प्रेमाने स्वागत झालं. तिथे गेल्यानंतर ‘गुलकंद’ आणि नाटकासाठी माझी एक मुलाखतसुद्धा झाली. अमेरिकेत मुलाखत दिल्याचा आनंद झाला.”
अभिनेता पुढे म्हणाला, “शेवटच्या प्रयोगाच्या निमित्ताने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आमच्या सगळ्यांसाठी पत्र लिहिलं होतं, ते त्यांनी वाचून दाखवलं. तो क्षण भावुक करणारा होता. अमेरिकेत दहा प्रयोग झाल्यानंतर हा दौरा संपला. नाटकाचे प्रयोग संपल्यानंतर आम्ही अमेरिकेत भटकंती केली. या दौऱ्याच्या खूप आठवणी मनात घेऊन आम्ही भारतात परतलो”, अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रसाद ओक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही दिसतो. गुलकंदबरोबरच तो सुशीला सुजीत या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनयाबरोबरच तो निर्मातादेखील होता. सोनाली कुलकर्णी व स्वप्नील जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. आता अभिनेता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.