Pravin Tarde Birthday Special : “आरारारा खतरनाक…” हे दोन शब्द जरी ऐकले तरी डोळ्यासमोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजेच प्रवीण तरडे! काही लोकांचं सिनेमावर प्रेम असतं, तर काही जण फक्त आवड म्हणून सिनेमे बनवतात. पण, मुळशीच्या मातीत जन्मलेल्या या रांगड्या नटाने थेट बॉलीवूडच्या भाईजानला सिनेमा म्हणजे माझा ‘जीव’ आहे असं छाती ठोकून सांगितलं होतं. बिनधास्त व बेधडक स्वभाव, कितीही यश मिळवलं तरी मातीशी जोडली गेलेली नाळ आणि स्वभावातील स्पष्टवक्तेपणामुळे प्रवीण तरडे कायम सर्वांना आपला पॅटर्नच वेगळा आहे असं सांगतात.

‘रेगे’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’पासून सुरू झालेला प्रवीण तरडेंचा प्रवास आता ‘धर्मवीर २’ पर्यंत येऊन पोहोचला आहे. मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये असताना त्यांचा रंगभूमीशी अप्रत्यक्षपणे संबंध आला. पुढे त्यांना बॅकस्टेजवर काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर तरडेंच्या सुबोध भावे, अमित फाळकेंशी भेटीगाठी व्हायला लागल्या अन् बॅकस्टेजला काम करणारा हा कलावंत कालांतराने चित्रपटसृष्टीचा ‘नन्या भाई’ झाला.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Riteish Deshmukh post for brother father in law
आमदार भावाच्या सासऱ्यांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

…म्हणून ११ वर्ष होते घराबाहेर

बारावीच्या प्रत्येक पेपरला किमान अर्धा तास तरी विद्यार्थ्याने बसलं पाहिजे असा नियम त्याकाळी होता. एकीकडे बारावीचा पेपर अन् दुसरीकडे सचिनची बॅटिंग या दोघांमध्ये प्रवीण तरडेंचा जीव अडकून होता. अखेर अर्ध्या तासाने पेपरवर तुळशीपत्र ठेऊन त्यांनी सचिनची बॅटिंग पाहण्यास पसंती दिली. अर्थात यामुळे ते बारावीत नापास झाले. या एका चुकीचा भविष्यात त्यांना एवढा पश्चाताप झाला की, पुढे त्यांनी एम कॉम (M.Com), एमबीए (MBA) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण घेत सगळ्या परीक्षांमध्ये चांगल्या मार्कांनी यश मिळवलं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर ते आयोगाची एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. पण, तेव्हाच नाटकाचं प्रचंड वेड डोक्यात शिरल्याने त्यांनी नोकरी स्वीकारणार नाही असा थेट निर्णय पालकांना सांगितला. या निर्णयानंतर तरडेंना राहत्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि पुढे ते ११ वर्ष घराबाहेर राहिले.

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या आठवणी…

‘मुळशी पॅटर्न’ हा ‘दोस्तांचा चित्रपट’ आहे आणि मी ‘दोस्तांचा दिग्दर्शक’ असं प्रवीण तरडे त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत सांगतात. याचं मुख्य कारण म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’ बनवताना त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यांनी चित्रपटासाठी बायकोचे दागिने विकून सगळं काही पणाला लावलं होतं. अशा परिस्थितीत त्यांना मित्रांनी खंबीर साथ दिली होती. महेश लिमये, उपेंद्र लिमये यांना चित्रपट करताना माझ्याकडे एकही पैसा नाही असं तरडेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं. पुढे, चित्रपट लोकप्रिय ठरल्यावर तरडेंनी त्यांच्या मित्रांना मानधन दिलं. याबद्दल ‘बोलभिडू’च्या मुलाखतीत सांगताना प्रवीण तरडे म्हणाले होते, “‘मुळशी पॅटर्न’ हा माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट… खिशात पैसे नसताना तो चित्रपट मी बनवला. देवेंद्र गायकवाड (दया भाई ), रमेश परदेशी ( पिट्या भाई ) या माझ्या दोन मित्रांनी आजही ‘मुळशी पॅटर्न’चे पैसे घेतलेले नाहीत. त्यांनी फुकट काम केलं होतं. उपेंद्र आणि महेशला अनेक दिवसांनी मी त्यांचं मानधन दिलं. जेव्हा लोक मला विचारतात… काय तुझ्या चित्रपटात तेच-तेच लोक असतात. त्यांना खास सांगेन की, ज्या मित्रांनी माझ्या अडचणीच्या काळात फुकट काम केलं त्यांना मी कसा काय विसरू? त्यावेळी हे नट पैशांसाठी अडून बसले असते तर, प्रवीण तरडेनं कुठून आणला असता एवढा पैसा?”

‘मुळशी पॅटर्न’चा पुढे हिंदीत रिमेक करून ‘अंतिम’ चित्रपटाचा घाट घालण्यात आला होता. यासाठी सलमान खानने विशेष पुढाकार घेतला होता. पण, प्रवीण तरडेंनी या प्रोजेक्टमधून हात बाजूला केल्याने ‘अंतिम’वर फ्लॉपची पाटी बसली. ‘अंतिम’मध्ये आयुष शर्माला जरूर घ्या पण, बाकी संपूर्ण टीम मराठी कलाकारांची ठेवा असं प्रवीण तरडेंचं म्हणणं होतं. अर्थात भाईजान आणि त्यांचे विचार जुळले नाहीत अन् तरडेंनी या चित्रपटामधून बाजूला होणं स्वीकारलं.

प्रवीण तरडेंचं मालिका विश्व

‘कुंकू’, ‘पिंजरा’ या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांच्या लिखाणामध्ये प्रवीण तरडेंचा मोठा वाटा आहे. स्वत:च्या खऱ्या लग्नात मंगलाष्टक सुरू व्हायच्या अगदी ५ मिनिटं आधीपर्यंत ते मालिकेचे एपिसोड लिहून देत होते. ‘अग्निहोत्र’सारख्या गाजलेल्या मालिकेच्या शेवटच्या भागांतील संवाद लेखनातही त्यांचा मोलाचा वाटा होता. या मालिकांचं लिखाण करताना त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर सुखी जीवनाची स्वप्न पाहणारा हा कलावंत ऑनस्क्रीनवर काम करणाऱ्या जोडप्यांच्या तुटलेल्या नात्यांच्या कहाण्या लिहीत होता.

धर्मवीर करताना घाम फुटला

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ चित्रपट प्रवीण तरडेंच्या आयुष्यात सर्वात मोठा माईलस्टोन ठरला. हा चित्रपट दिघे साहेबांवर आधारित असल्याने त्यांनी प्रत्येक सीनचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांनी केलेल्या प्रत्येक कष्टाचं चीज झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

‘देऊळबंद’ करताना ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती

‘मुळशी पॅटर्न’पूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळबंद’ चित्रपटामुळे प्रवीण तरडेंना एक वेगळी ओळख मिळाली होती. स्वामी समर्थांच्या मठात त्यांना या चित्रपटाची संपूर्ण कथा सुचली होती. तरडे देवाची पूजा करायचे पण, त्यांची श्रद्धा नव्हती. ‘देऊळबंद’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची अनेक व्यक्तींशी गाठभेट झाली. नाशिकच्या मठात जाताना प्रवासात झोप नाही आणि उलट्यांच्या त्रासामुळे त्यांच्याकडे निर्मात्यांना सांगण्यासाठी कोणतीच कथा नव्हती. परंतु, दर्शन झाल्यावर जेव्हा त्यांना कथा ऐकवण्यास सांगितली तेव्हा प्रवीण तरडेंनी लगेच गोष्ट सांगायला सुरूवात केली. हा प्रसंग त्यांच्यासाठी अद्भूत होता. त्या एका घटनेमुळे त्यांचा श्रद्धा काय असते? यावर विश्वास बसला अन् दुसरीकडे प्रदर्शित झाल्यावर ‘देऊळबंद’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर निर्माण केलं.

एस.एस. राजामौलींना आदर्श मानणारा ‘दोस्तांचा दिग्दर्शक’

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस.राजामौली यांच्याबरोबर काम करायला मिळणं हे प्रवीण तरडेंचं सर्वात मोठं स्वप्न! आजही त्यांच्या ऑफिसमध्ये एन्ट्री घेतल्यावर सर्वात आधी भिंतीवर लावलेला मोठ्या आकाराचा राजामौलींचा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतो. प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये मागील सात ते आठ वर्षांपासून हा फोटो आहे. आपल्याला आदर्श वाटणाऱ्या दिग्गज व्यक्तीबरोबर एकदा तरी काम करायला मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी भाग्याची गोष्ट असते. लवकरच एस.एस.राजामौली दिग्दर्शित चित्रपटात प्रवीण तरडे खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं नाव त्यांनी अद्याप उघड केलेलं नाही.

कथा, पटकथा, संवाद, लेखक, दिग्दर्शक… सिनेविश्वातील कोणतंच क्षेत्र त्यांना वर्ज राहिलेलं नाही. इतिहासातील सरसेनापती हंबीरराव असोत किंवा मुळशीतील नन्या भाई प्रत्येक भूमिका प्रवीण तरडेंनी पडद्यावर उत्तमरित्या साकारल्या. अशा या मातीशी नाळ जोडलेल्या दोस्तांच्या दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!