प्रवीण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. आता या चित्रपटासाठी त्यांना एक मोठा पुरस्कार मिळाला असल्याचं त्यांनी शेअर केलं.
प्रवीण तरडे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात प्रसाद ओकची मुख्य भूमिका होती. त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील प्रसाद ओकच्या भूमिकेबरोबरच प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचंही तेवढंच कौतुक झालं होतं. तर आता या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालं आहे.
फिल्मफेअर २०२३ साठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी नामांकन मिळालं होतं. तर या पुरस्कारावर त्यांनी त्यांचं नाव कोरलं. त्यांना मिळालेल्या या ट्रॉफीचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहीलं, “सगळीच बक्षिसे सारखी नसतात , काही फिल्मफेअर असतात…फिल्मफेअर २०२३…सर्वोत्कृष्ट संवाद – धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे.”
हेही वाचा : “मी ‘धर्मवीर’च्या पुढच्या भागातही…” प्रवीण तरडेंच्या वाढदिवशी प्रसाद ओकची सुचक पोस्ट
आता त्यांची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट्स करत त्यांचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील त्यांची मित्र मंडळी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तर याचबरोबर ‘धर्मवीर २’साठी उत्सुक असल्याचं त्यांचे चाहते त्यांना सांगत आहेत.