Premachi Goshta 2 Trailer release:’सकाळ तर होऊ द्या’, ‘मनाचे श्लोक’, हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. १० ऑक्टोबर २०२५ ला हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट २’चा जबरदस्त ट्रेलर

‘प्रेमाची गोष्ट २’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरच्या सुरुवातीला केस क्रमांक ३४८३८ असे पुकारले जाते. ललित प्रभाकर चित्रपटात अर्जुन या भूमिकेत आहे. अर्जुन म्हणतो की म्हणे लग्नाच्या गाठी वर स्वर्गात जुळतात. या असल्या गाठी ज्या वर्षभरसुद्धा टिकत नाहीत. त्यावेळी त्याच्या आयुष्यातील काही घटना बघायला मिळतात.

पुढे स्वप्नील जोशी वकिलाच्या वेशात दिसतो. त्याच्याबरोबर भाऊ कदमदेखील दिसत आहेत. स्वप्नील जोशीचे पात्र अर्जुनला विचारते की तुला तुला बायकोपासून घटस्फोट का हवा आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, “माझं माझ्या बायकोशी पटत नाही.” त्यावर भाऊ कदम यांचे पात्र म्हणते की , “तसं तर माझं व आबुरावचंसुद्धा कधीकधी पटत नाही. म्हणून मी घटस्फोट घेतला का?, त्यावर स्वप्नील त्यांच्याकडे बघतो. मग भाऊ सांगतात की मी उदाहरण दिलं.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अर्जुन एका मुलीला म्हणतो अनोळखी मुलीबरोबर मी कधीच लग्न करणार नाही. ती मुलगी म्हणते की आपण लग्न करूयात. प्रोमोमध्ये काही गमतीजमती घडताना दिसतात. अर्जुन मैत्रीण प्रिया अनेक वर्षानंतर त्याच्या आयुष्यात परत येते. ते एकत्र आयुष्याचा आनंद घ्यायला सुरू करतात.

पुढे अर्जुन हव्या त्या गोष्टी मिळत नसल्याचा दोष नशिबाला आणि देवाला देतो. प्रोमोच्या शेवटी स्वर्गदेखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटात ड्रामा, रोमँटिक सीन आणि गमतीजमतीदेखील पाहायला मिळत आहे.

ट्रेलरमध्ये लालितच्या आयुष्यात आलेली वळणे ठळकपणे दिसत आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम, या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशीब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. स्वप्नील जोशी, ललित प्रभाकर, भाऊ कदम यांच्याबरोबरच चित्रपटात रिद्धिमा पंडीत, ऋचा वैद्य, अविनाश नारकर, प्रसाद बर्वे असे अनेक कलाकार दिसत आहेत. अमित भानुशाली चित्रपटाचा सह निर्माता आहे. अभिनेता सध्या लोकप्रिय ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे. हा ट्रेलर शेअर करताना आता नशिबाला मिळणार सेंकड चान्स आणि होणार अगदी मनासारखं… अशी कॅप्शन दिली आहे.

दिग्दर्शक सतीश राजवाडे चित्रपटाविषयी म्हणतात, “ही एक फ्रेश आणि आजच्या काळाशी सुसंगत अशी प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचं तंत्रज्ञान केवळ दृश्यात्मक सौंदर्य वाढवण्यासाठी नाही. तर, कथा सांगण्याचा एक नवा मार्ग म्हणून वापरलं आहे. ही कथा जेन झी प्रेक्षक आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणारी आहे. म्हणजेच संपूर्ण कुटुंबासाठी योग्य असा हा चित्रपट आहे.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, “सतीशबरोबर माझा हा चौथा चित्रपट आहे. एकत्र आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्तम चित्रपट घेऊन आलो आहोत. आता प्रेक्षकांसाठी ‘प्रेमाची गोष्ट २’ घेऊन येत आहोत आणि प्रेक्षकांना ही प्रेमाची गोष्ट नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आम्ही नेहमी प्रेक्षकांसाठी मनाला भिडणाऱ्या आणि वेगळेपणा जपणाऱ्या कथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही त्याच परंपरेतली आणखी एक खास प्रेमकथा आहे, जी आजच्या पिढीच्या भावनांना आणि विचारांना अचूक स्पर्श करणारी आहे. सतीश राजवाडे यांनी ही कथा ज्या संवेदनशीलतेने उभी केली आहे, ती प्रेक्षकांना नक्की भावेल.”

आता या चित्रपटात स्वप्नील जोशी, भाऊ कदम यांच्या भूमिकांची नावे काय आहेत, तसेच, त्यांच्या भूमिकांमुळे चित्रपटात काय गंमत येणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकरचा आरपार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता प्रेमाची गोष्ट २ लादेखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.