Priyadarshini Indalkar Talk About Dashavatar Sequel : गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे, तो सिनेमा म्हणजे ‘दशावतार’. ‘दशावतार’ या सिनेमाने अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड तयार केलं आहे.

१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची बॉक्स ऑफीसवरील घोडदौड अजूनही यशस्वीपणे सुरू आहे. कोकणातल्या मातीतली कथा, कलाकारांचा सशक्त अभिनय, संगीत या आणि अशा अनेक घटकांमुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

‘दशावतार’ची जादू असतानाच आता ‘दशावतार २’बद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. सिनेमाच्या शेवटावरून अनेक प्रेक्षक सीक्वलबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. याबद्दल दशावतार’मधील वंदू म्हणजेच अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, “बरेच जण असंच म्हणतायेत की ‘दशावतार’चा सीक्वेल यावा. माझी तर खूप इच्छा आहे. सिनेमाच्या शेवटी बाबुली काका (दिलीप प्रभावळकर) मला ‘भैरवीची वेळ झाली; आता पुढची जबाबदारी तुझी. तू हा लढा पुढे चालू ठेव’ असं सांगतात. याबद्दल अनेक मेसेज येत आहेत. यावरुन बरेच जण म्हणत आहेत की, ‘दशावतार’चा दुसरा भाग यावा आणि आला तर त्यात वंदनाची भूमिका मोठी असेल. त्यामुळे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सीक्वेलचा विचार केला तर मी एका पायावर तयार आहे.”

दरम्यान, सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’मध्ये दिलीप प्रभावळकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरसह महेश मांजरेकर,भरत जाधव, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, रवी काळे, सुनील तावडे, आरती वडगबाळकरसह अनेक कलाकार आहेत. सिनेमाला सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम पोस्ट

उत्तम कथानक, उत्तम अभिनय, उत्तम संगीत असलेला हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस पडत आहे. कोकणातल्या बाबुली मेस्त्रीची ही गोष्ट मराठी रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या दोन बिग बजेट सिनेमांबरोबरच ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान टिकवून आहे.