Pune Leopard Attack Hemant Dhome Shares Post : गेल्या काही महिन्यांत अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा जीव गेला होता. या घटनेला महिना होतोच, तेवढ्यात आता आणखी एका लहान मुलानं बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावला आहे.

पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. या बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय रोहन विलास बोंबे याने जीव गमावला आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे कार्यालय आणि वाहन जाळलं आहे. याबद्दल संताप व्यक्त होत आहेत. लोकांचे जीव जात आहेत, पण वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. या घटनेबद्दल मराठी अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेनं पोस्ट शेअर केली आहे. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी पावलं उचलली जावीत अशी मागणीही त्याने केली आहे.

हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली तळमळ व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे, तर त्यानं स्टोरीद्वारे बिबट्याच्या पाऊलाचे ठसेही शेअर केले आहेत. हेमंतनं पोस्टमध्ये लिहिलं, “पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी… माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला. लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला. सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की, लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. आज जमावाने कायदा हातात घेतला आहे. गेल्या काही दिवसात माझ्या भागात ११ मृत्यू झाले आहेत. चित्र खूप भयानक आहे. प्रचंड भीती आहे. पशूधनाची तर यात मोजणीसुद्धा झालेली नाही. आधीच अस्मानी संकटाने कंबरडं मोडलंय; त्यात हे जंगली संकट.”

हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी

यापुढे हेमंत म्हणाला, “आता सहनशक्तीचा अंत होणार आणि लोक कायदा हातात घेणार यापेक्षा Human Widlife Conflict वर Sustainable उपाययोजना आणि कायदे आखण्यात यावेत. जनजागृती व्हावी. मागेच जवळपास २० वर्षांपूर्वी याबाबतीत विद्या अश्रेया यांनी प्रचंड काम केलं आहे, त्याकडेही डोळेझाक झाली आहे. आपण जंगलात घुसलो आहोत हे बरोबर आहे; पण जंगलापासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागत आहे. जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भुमीमालकांचं जगणं कठीण झालंय. एक अमोल कोल्हे सोडल्यास आमचे बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मशगुल आहेत कोणास ठाऊक?”

हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, याआधी १३ ऑक्टोबर रोजी पिंपरखेडमधील बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यूबद्दलही हेमंतनं पोस्ट शेअर केली होती. तेव्हाही त्यानं नुसते पिंजरे लावून काही होणार नाही तर त्यासाठी दूरगामी उपाययोजनांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अशातच आता त्यानं पुन्हा एकदा बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे.