मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी त्यांनी गोरेगाव येथे ‘सुका सुखी’ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं. त्यांच्या या हॉटेल क्षेत्रातील नव्या व्यवसायाला नागरिकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. ‘सुका सुखी’मध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक खवय्ये येत असतात. नुकताच महेश मांजरेकर यांनी त्यांच्या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये एक नवीन पदार्थ लॉन्च केला. हा पदार्थ लॉन्च करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास महेश मांजरेकरांच्या रेस्टॉरंटमध्ये आज उपस्थिती लावली होती.

महेश मांजरेकर यांच्या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते ‘मालकी’ म्हणजेच मालवणी फ्रँकी हा पदार्थ लॉन्च करण्यात आला. याशिवाय या रेस्टॉरंटमध्ये राज ठाकरेंनी अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात…

राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “महेश मांजरेकरांच्या डोक्यात कुठून या गोष्टी येतात मला कळत नाही. मग ती चित्रपटाची कथा असूदेत किंवा जेवण… त्याच्या मनातले प्रत्येक विचार तो सत्यात उतरवतो. आज त्यांच्या ‘सुका सुखी’ हॉटेलला दोन वर्षे झालेली आहेत. हॉटेलच्या नावातच यामध्ये कोणकोणते पदार्थ मिळणार याची प्रचिती लोकांना येते. मी खूपदा इथून जेवण मागवतो. माझ्या जेवणाच्या अशा काही आवडत्या जागा आहेत त्यापैकी एक म्हणजे सुका सुखी! इथे उत्कृष्ट मासे मिळतात, माशांचे प्रकारही अनेक आहेत. महेशला मी फक्त एवढंच सांगेन की…आता हे हॉटेल आणखी मोठं कर, हे वाढव. आजपासून त्यांनी मालवणी फ्रँकी हा नवीन पदार्थ सुरू केला आहे. या मालवणी फ्रँकीला त्याने ‘मालकी’ असं नाव दिलंय. मी आता फ्रँकी खालली…छान आहे, झणझणीत आहे. महेश कोणतीही गोष्ट करतो त्याला मी कधीच नाही बोलत नाही. ( काही गोष्टी सोडल्या तर…) माझ्या हाकेला तो नेहमी “ओ” देत असतो. त्याच्या हाकेला मी नेहमी “ओ…” देतो. त्याच्याबरोबर माझ्या शुभेच्छा कायम राहतील.”

महेश मांजरेकर म्हणाले, “मालकी म्हणजेच मालवणी फ्रँकी सुरू करण्याआधी ती नेमकी कशीये हे मला राज यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. त्यांना ही फ्रँकी आवडली…आणि आता हा पदार्थ मला महाराष्ट्रभर लोकप्रिय करायचा आहे… सर्वांना ही फ्रँकी आवडली त्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मालकी’ ( मालवणी फ्रँकी ) लॉन्च करताना महेश मांजरेकरांच्या ‘सुका सुखी’ हॉटेलमध्ये त्यांच्या दोन्ही मुली, पत्नी व मुलगा असे सगळे कुटुंबीय उपस्थित होते. आता भविष्यात मांजा आईस्क्रीम लॉन्च करणार असल्याचं मांजरेकरांनी यावेळी सांगितलं.