Marathi Actor Vivek Lagoo Passed Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते-दिग्दर्शक विवेक लागू यांचे गुरुवारी (१९ जून २०२५ रोजी) निधन झाले. ते दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. विवेक लागू यांनी मराठी आणि हिंदी अभिनयविश्वात खूप काम केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विवेक लागू यांचे अंत्यसंस्कार आज मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत होणार आहेत.
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या विवेक लागू यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर चाहते व राजकीय नेते, तसेच कलाविश्वातील सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. विवेक यांची लेक मृण्मयी लागूनेदेखील पोस्ट शेअर केली आहे. मंत्री आशिष शेलार यांनीही विवेक यांना श्रद्धांजली वाहिली.
आशिष शेलार यांची पोस्ट
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं.
भावपूर्ण श्रद्धांजली!
अभिनेते विवेक लागू यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीने एक हसरे, सजग आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांची रंगभूमीवरील सशक्त सादरीकरणशैली, दूरदर्शनवरील सोज्वळ आणि मनाला भिडणाऱ्या भूमिका, तसेच प्रसंगी दिलखुलास विनोदी छटा या सर्वांनी ते रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना, अशी पोस्ट एक्सवर आशिष शेलार यांनी केली.
कोण होते विवेक लागू?
विवेक लागू हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जायचे. त्यांनी ‘श्रीमान श्रीमती’ सारख्या टीव्ही शोसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रीमा लागू यांच्याशी लग्न केलं होतं. १९७६ मध्ये त्यांची भेट झाली. मात्र, नंतर ते वेगळे झाले. रीमा लागू यांचे २०१७ मध्ये निधन झाले. या जोडप्याला एक मुलगी आहे. तिचं नाव मृण्मयी लागू वायकूळ आहे. मृण्मयी अभिनेत्री आणि नाट्यदिग्दर्शिका आहे.
विवेक लागू यांनी अग्ली (२०१३), सर्व मंगल सावधान (२०१६) आणि व्हॉट अबाउट सावरकर? (२०१५) मध्ये काम केलं होतं.