Renuka Shahane on Dilip Prabhavalkar: सध्या एका मराठी चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांच्या मनावर हा चित्रपट राज्य करताना दिसत आहे. १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दशावतार ही प्रामुख्याने कोकणात सादर होणारी नाट्यकला आहे. कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट सर्वांच्या मनावर भुरळ घालत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे.
रेणुका शहाणे म्हणाल्या…
दशावतार हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करीत चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हा सिनेमा पाहताना आपण भावूक होतो, असे म्हटले आहे. तर, अनेकांनी हा सिनेमा सर्वांनी पाहावा, असे आवाहनदेखील केले आहे.
प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील थिएटरमध्ये जाऊन ‘दशावतार’ सिनेमा पाहिला आहे. कलाकारांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या या चित्रपटाबद्दल काय भावना आहेत, हे पाहायला मिळत आहे.
गश्मीर महाजनीने नुकतीच पोस्ट शेअर करीत एक चांगला सिनेमा पाहिला असल्याचे लिहिले. प्राजक्ता माळीनेदेखील पोस्ट शेअर करीत या चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले. तर, आता लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील सोशल मीडियावर ‘दशावतार’बद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रेणुका शहाणे यांनी इन्स्टाग्रामवर ‘दशावतार’ सिनेमाचे पोस्टर शेअर केले. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, “अजिबात चुकवू नका. हा अप्रतिम चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा. सुबोध खानोलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करावं तितकं कमीच आहे.”

पुढे त्यांनी दिलीप प्रभावळकर यांना टॅग करीत लिहिले, “साष्टांग दंडवत”, असे लिहिले आहे. चार दिवसांत या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबरच महेश मांजरेकर व भरत जाधव हेदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. तसेच, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, आरती वडगबाळकर, विजय केंकरे, लोकेश मित्तल, सुनील तावडे, रवी काळे या कलाकारांनीदेखील त्यांच्या भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.