आपल्या अभिनयाने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे (Renuka Shahane). रेणुका यांनी ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यांची या चित्रपटातील आदर्श सुनेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. २००१ मध्ये रेणुका यांनी अभिनेते आशुतोष राणांबरोबर (Ashutosh Rana) लग्न केलं. दोघांकडे आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते.

रेणुका शहाणे व आशुतोष राणा हे आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र या दोघांनी आजवर एकाही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत आणि त्यांनी एकत्र कामही केलं आहे. पण रेणुका आणि आशुतोष यांनी मात्र आजवर कधीच कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही.

याबद्दल रेणुका यांनी अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’मध्ये भाष्य केलं आहे. यावेळी रेणुका यांनी असं म्हटलं की, “एक विवाहित जोडपे असल्यामुळे ज्या गोष्टी आपण स्वीकारू शकतो. म्हणज आता आमची मुलं पण आहेत. तर त्या गोष्टींचं भान ठेवूनच काही गोष्टी केल्या पाहिजेत. तर तसं काही अजून ऑफर झालेलं नाही. झालं असतं तर आतापर्यंत आम्ही केलं असतं. कारण ते करायची आम्हाला खूपच इच्छा आहे.”

यापुढे रेणुका यांनी असं म्हटलं की, “एकत्र काम करायचं नाही असं आम्ही काहीच ठरवलेलं नाही. राणाजींच्या अनेक चित्रपटांमधील बायकोच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात येतं. त्यावर ते असं म्हणतात की, असं काही नाही. ती एक व्यक्ती आहे, अभिनेत्री आहे आणि तिची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे असं नाही की, माझ्या पत्नीची भूमिका आहे तर ही करेलच. आमच्यात तसं नसतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘त्रिभंगा’, ‘रिटा’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांमधून रेणुका शहाणेंनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच त्या ‘देवमाणूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर महेश मांजरेकर,सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके या मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.