Rinku Rajguru Attend Ashadi Pandharpur Wari : विठुरायाच्या नामाचा गजर करत दरवर्षी आषाढ महिन्यात हजारो वारकरी पंढरीची वारी करतात. वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. हे वारकरी तहान-भूक विसरून, विठ्ठलाची भक्तीगीते, भजन गात पंढरीची वाट धरतात.

वारीचा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी तसेच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी यंदा मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार वारीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. आदेश बांदेकर, सायली संजीव, छाया कदम, कश्मिरा कुलकर्णी, अमित भानुशाली, अभिजीत आमकर, शर्वरी जोग अशा अनेक कलाकारांनी यंदाच्या वारीत सहभाग घेतला.

आता या कलाकारांपाठोपाठ महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु देखील पंढरीच्या वारीत आपल्या वडिलांसह सहभागी झाली आहे. कपाळी केशरी गंध, हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेत तिने ही पायवारी केली. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पारंपरिक लूकमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत होती. अभिनेत्री यावेळी वडिलांसह फुगडी खेळली. तसेच रिंकू इतर महिला वारकऱ्यांसह काही पारंपरिक खेळ खेळल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

रिंकूने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्री हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “जय जय राम कृष्ण हरी! हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास आहे कारण, मी ४ वर्षांची असताना माझ्या वडिलांसह पहिल्यांदा वारी अनुभवली होती. आज २० वर्षांनंतर मी पुन्हा तेच क्षण अनुभवतेय…”

रिंकूने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सुरेख रिंकू”, “जय जय राम कृष्ण हरी”, “तुझ्यामुळे वारी व्हिडीओच्या रुपात अनुभवता आली” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रिंकू राजगुरुबद्दल सांगायचं झालं तर, ‘सैराट’ चित्रपटामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. या सिनेमात रिंकूने आर्ची हे पात्र साकारलं होतं. यानंतर अभिनेत्रीने ‘झिम्मा २’, ‘कागर’, ‘झुंड’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. आता लवकरच अभिनेत्री ‘पुन्हा एकदा साडेमाडे तीन’ या सिनेमात झळकणार आहे.