Rinku Rajguru on age gap between her and Subodh Bhave in upcoming movie: अभिनेत्री रिंकु राजगुरू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेटर-हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिंकु राजगुरूसह अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरेदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच रिंकू राजगुरूने ‘अल्ट्रा मराठी बझ’शी संवाद साधला. या मुलाखतीत रिंकू राजगुरूने प्रेक्षकांच्या काही कमेंट्सवरही तिचे मत मांडले. रिंकू आणि सुबोधसरांमध्ये खूप जास्त वयाचं अंतर आहे, अशी एक कमेंट होती. त्यावरदेखील अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. आता अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, ते जाणून घेऊ…

रिंकू राजगुरू काय म्हणाली?

रिंकू राजगुरू म्हणाली, “चित्रपटाची मागणीच तशी होती. चित्रपटातसुद्धा आम्ही साकारलेल्या पात्रांमध्ये वयाचं तितकंच अंतर आहे. असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं आणि वय बघून आपण प्रेमात पडत नाही. तशी ती मुलगी प्रेमात पडते. अशा बऱ्याच गोष्टी चित्रपटात आहेत.”

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रिंकू राजगुरूच्या कामाबद्दल बोलायचे, तर २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने झिम्मा २, आशा, झुंड, अनकहीं कहानियाँ, कागर अशा चित्रपटांतून काम केले आहे. नुकताच तिला आशा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

प्रार्थना बेहेरे ही चिकी चिकी बुबूम बुम या चित्रपटात दिसली होती. आता ती ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुबोध भावे हे त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. नुकतेच ते झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेत त्यांनी समर ही भूमिका साकारली आहे.

दरम्यान, आता तीन लोकप्रिय कलाकारांचा हा नवीन चित्रपट नेमका कसा असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.