Riteish Deshmukh : गणपती असो किंवा दिवाळी देशमुख कुटुंबीय सगळे सण लातूरच्या त्यांच्या मूळ घरी एकत्र येऊन साजरे करतात. मात्र, यंदा रितेशला लातूरला जातं आलं नाही. गेल्या काही दिवसांपासून रितेश त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दिवाळी लंचला सुद्धा तो उपस्थित नव्हता. यामुळे त्याच्या दोन्ही मुलांनी अभिनेत्यासाठी खास पत्र लिहिलं होतं आणि ‘राजा शिवाजी’ सिनेमाला प्रदर्शित झाल्यावर भरपूर यश मिळूदेत अशा शुभेच्छा त्यांच्या लाडक्या बाबाला दिल्या होत्या.

रितेश देशमुख यानंतर व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून त्यांच्या मुंबईच्या घरी पोहोचला आहे. याठिकाणी अभिनेत्याने जिनिलीया व दोन्ही मुलांसह दिवाळी पाडवा साजरा केला. सर्वप्रथम त्याने रियान अन् राहिल यांना उटणं लावून अभ्यंगस्नान घातलं. यानंतर रितेशची दोन्ही मुलं रांगोळी काढत असल्याचं अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

रितेश देशमुखने व त्याच्या दोन्ही मुलांनी यानंतर त्यांच्या घरच्या ‘लक्ष्मी’चं म्हणजेच जिनिलीया देशमुखचं औक्षण केलं. या व्हिडीओमध्ये शेवटी या चौघांनी मिळून दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

रितेश म्हणतो, “दरवर्षी आम्ही दिवाळीचा सण आमच्या कुटुंबीयांबरोबर बाभळगाव लातूर येथे साजरा करतो. पण, यावर्षी ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग सुरू असल्यामुळे आम्ही लातूरला जाऊ शकलो नाही. पण, आमच्या घरच्या परंपरा आम्हाला कायम लक्षात राहणार आहेत…यामुळेच आम्ही मुंबईत दिवाळी पाडवा साजरा केला. तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! खूप प्रेम, देशमुख परिवार”

दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा एकूण सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रत्येकाच्या मनात या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.