अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. ते दोघंही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. जिनिलिया आणि रितेश अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता लवकरच ही जोडी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. वेड असे या मराठी चित्रपटाचे नाव असून नुकतंच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाच्या टीझरची जोरदार चर्चा सुरु आहे.

जिनिलिया देशमुख हिने नुकतंच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे दोघेही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘वेड’च्या टीझरच्या सुरुवातीला रितेश देशमुख प्रेमाबद्दल बोलताना दिसत आहे. त्यानंतर जोरदार कोसळणाऱ्या पावसात फायटिंग करत असलेल्या रितेशच्या चेहऱ्यावर काहीसे रागाचे आणि व्याकूळ भाव आहेत. अशातच त्याच जिनिलियाची एंट्री होते. सिगारेटचे झुरके घेत भर पावसात जिनिलियासमोरून जाणारा रितेश सर्वांची उत्कंठा वाढवतो. याशिवाय या टीझरमध्ये रितेशचा “प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखं प्रेम करतात तर काही प्रेमातलं वेड होतात” हा संवाद मनाचा ठाव घेतो.
आणखी वाचा : Ved Teaser : “…तर काही प्रेमातलं वेड होतात” रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर!

जिनिलियाने त्यांच्या या वेड चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “आवड होती म्हणून हिंदीत अभिनय सुरु केला. प्रेम होतं म्हणून तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केले. आणि आता वेड आहे म्हणून मराठीत आलेय”, असे तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याबरोबर तिने “माझ्या वेडचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तुम्हीही या वेडेपणात सहभागी व्हा”, असेही आवाहन चाहत्यांना केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. जिनिलिया देशमुख या चित्रपटाची निर्माती आहे.