Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Actors : रितेश देशमुख गेल्या काही महिन्यांपासून ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा ऐतिहासिक सिनेमा रितेश-जिनिलीयासाठी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे अभिनेता रात्रंदिवस या चित्रपटासाठी मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतंय. शूटिंग शेड्युलमुळे यंदा रितेश-जिनिलीया दिवाळी साजरी करण्यासाठी लातूर सुद्धा गेले नव्हते. यावेळी अभिनेत्याच्या दोन्ही मुलांनी लाडक्या बाबासाठी पत्र लिहित शूटिंग छानपैकी पूर्ण कर…सिनेमाला भरपूर यश मिळूदेत अशा शुभेच्छा त्याला दिल्या होत्या.
‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. लवकरच या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट होऊन हा शूटिंगचा प्रवास संपेल अशी माहिती लोकप्रिय अभिनेता कपिल होनरावने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता कपिल होनरावची रितेशच्या सिनेमात वर्णी लागली आहे.
कपिल होनराव म्हणतो, “आम्ही आलोय ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या आऊटडोअर शूटला…या महिन्यात आमचं क्लायमॅक्सचं शूटिंग पूर्ण होणार आहे. हा वर्षभराचा प्रवास लवकरच संपणार आहे…हे कदाचित शेवटचं आऊटडोअर शूट असेल. यानंतर आता बाकीचं शूट मुंबईत होईल.”

‘राजा शिवाजी’ सिनेमात सलमान खानची एन्ट्री? ‘हे’ कलाकार झळकणार
‘राजा शिवाजी’ सिनेमात सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यानचे दोन दिवस सलमान खान शूटिंगसाठी सेटवर जाणार आहे. रितेश व सलमान यांच्यात अनेक वर्षे खूप चांगली मैत्री असल्याने त्याने या कॅमिओसाठी सलमानने लगेच होकार दिल्याची माहिती ‘पिंकव्हिला’ने दिली आहे.
रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वीच सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची नावं जाहीर केली होती. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात आहे.
याशिवाय रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. १ मे २०२६ मध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
