Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या सेटवरून मंगळवारी ( २२ एप्रिल ) एक धक्कादायक बातमी समोर आली होती. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक डान्सर नदीत बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत या तरुणाचा रेस्क्यू टीमकडून शोध सुरू होता.

बुधवारी ( २३ एप्रिल ) सकाळी पुन्हा एकदा ही शोध मोहीम हाती घेण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणावर आता स्वत: रितेश देशमुख व त्याच्या मुंबई फिल्म कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.

मुंबई फिल्म कंपनीचं अधिकृत निवेदन

अत्यंत खेदाने शूटिंग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत. संगम माहुली मंदिर, सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरू असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होतं. दुस-या दिवशीचं पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहोण्यासाठी उतरले. यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला.

सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनिलीया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यासाठी वापर करण्यात आला. रितेश देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी पाटील आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली.

शोधकार्य अजूनही सुरू आहे. आम्ही या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत. सौरभच्या कुटुंबीयांशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करित आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Film Company (@mumbaifilmcompany)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश व जिनिलीया या दोघांनीही हे निवेदन त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. सध्या घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. संगम माहुली नदीत मधोमध मोठा भोवरा आहे. या भोवऱ्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच जणांनी जीव गमावला आहे असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर याचं दिग्दर्शन स्वत: रितेश देशमुख करत असून, या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करत आहेत. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. लवकरच हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.