Saie Tamhankar said Bharat Jadhav is Devmanus : आजवर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांनी सर्वांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने आजवर अनेक चित्रपट व सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मोठ्या पडद्यासह ओटीटीवरही तिचा तितकाच वावर आहे. शिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारख्या शोमधून ती छोट्या पडद्याद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आपल्या स्टायलिश अंदाजाने सई कायमच चर्चेत राहत असते.

सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ लावणीची सर्वत्र चर्चा

गेल्या काही दिवसांपासून सई एका वेगळ्या कारणाने चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे सईची पहिली वहिली लावणी. सई ताम्हणकर तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका लावणीवर थिरकली आहे आणि या लावणीचं नाव आहे ‘आलेच मी’. या लावणीतील डान्समुळे सई सध्या चर्चेत आहे. ‘देवमाणूस’ या चित्रपटातील ही लावणी असून यानिमित्ताने ती सध्या माध्यमांशी संवाद साधत आहे.

सई ताम्हणकरसाठी भरत जाधव म्हणजे ‘देवमाणूस’

‘देवमाणूस’च्या निमित्ताने ‘अल्ट्रा मराठी बझ’शी गप्पा मारताना सईला तिच्या आयुष्यातील देवमाणूस कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना ती म्हणाली की, “खरंतर एक लोकप्रिय आणि छान अभिनेते आहेत त्यांचं टोपणनाव मी ‘देवमाणूस’ असं ठेवलं आहे आणि हा अभिनेता म्हणजे भरत जाधव. भरतदादाला मी देवमाणसा वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा देवमाणसा नवीन वर्षाच्या शुभेच्छा असेच मॅसेज करते. त्यामूळे मला देवमाणूस हे नाव वाचल्यानंतर त्यांचीच आठवण आली.”

सईने भरत जाधव ‘देवमाणूस’ असल्याचे सांगितलं कारण

यापुढे सईने भरत जाधव तिच्यासाठी देवमाणूस का आहेत? याचे उत्तर देताना असं म्हटलं की, “तो खूप साधा माणूस आहे. खूप चांगला माणूस आहे. त्यांच्यातल्या चांगुलपणामुळे मला त्यांना देवमाणूस म्हणावंसं वाटतं. आम्ही खूप वर्षांपुर्वी एक चित्रपट केला होता; ज्यावेळी मला त्यांच्या चांगुलपणाचा अनुभव आला होता. त्यामुळे तेव्हापासून भारत जाधव हा माणूस माझ्यासाठी देवमाणूस आहे.”

सईच्या ‘आलेच मी’ या लावणीची प्रेक्षकांना उत्सुकता

दरम्यान, विविधांगी भूमिकांमधून मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सई आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते याची वाट पाहत आहेत. सईची लावणी असलेला देवमाणूस चित्रपट येत्या २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सईची लावणी असलेल्या ‘देवमाणूस’ चित्रपटाबद्दल…

लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.