Dilip Prabhavalkar on Dashavatar: दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ हा सिनेमा १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

हा सिनेमा प्रामुख्याने कोकणात साजरा केला जाणाऱ्या दशावतार या नाट्यकलेवर अवलंबून आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. आता या सगळ्यात दिलीप प्रभावळकर यांनी एका मुलाखतीत दशावतारबाबत केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे.

“जेव्हा मी दशावतार बघितलं…”

दिलीप प्रभावळकर यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “जेव्हा मी दशावतार बघितलं आणि त्या कलाकारांबरोबर मी जेव्हा बोललो, तेव्हा माझी प्रतिक्रिया अशी होती की आपल्याला यांच्याबद्दल किती कमी माहिती आहे. त्यांच्यामध्ये किती गुण आहे. याचं कारण म्हणजे आम्हाला बांधलेल्या संहिता देतात. नाटकाचं पुस्तक असतं. त्यांच्याकडे संहिताच नसते. त्यांच्या हातात काहीच नसते.”

“रामायण, महाभारतमधील पात्र ठरवतात. कल्पना करून गोष्टी रचलेल्या असतात. संवाद उत्स्फूर्त असतात. मी दशावतार पाहिले. त्यामध्ये मुरलेल्या, निवृत्त झालेल्या कलाकारांबरोबर गप्पा मारल्या आहेत, त्यांचे अनुभव ऐकले आहेत.”

“मला बरं वाटलं नाही की आपण थिएटरमध्ये दशावतार नाट्यकला सादर करतो, ती शहरी करतो. याआधी मी फक्त या कलेबद्दल ऐकलं होतं. ते कलाकार स्वत:ची रंगरंगोटी, रंगभूषा स्वत: करतात पूर्ण कपडेपट स्वत: करतात. सगळं स्वावलंबन असतं. जे आम्ही कमी नटसंचामध्ये परदेश दौऱ्याला गेल्यानंतर नाइलाजाने, शिव्या देत देत कपड्यांच्या घड्या करतो.”

“पण, कोकणात दशावतार सादर करणारे कलाकार हे प्रत्येक प्रयोगाला ते करतात. त्यांच्याकडे माइक असतोच असं नाही. म्हणजे मी जे बघितलं ते माइकशिवाय सादरीकरण होतं. त्यांचा आवाज खणखणीत होता, तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात त्यांची दखल घ्यायला पाहिजे.”

“दशावतार चित्रपटाच्या निमित्ताने, दशावतारी कलेवर, या प्रकारावर, या परंपरेवर जर अधिक लक्ष वेधलं गेलं, त्यांना चांगले दिवस आले, भरभराट झाली तर सगळीकडे दशावतार पोहोचेल. तर मला असं वाटतं की, ते आणखी एक दशावतार सिनेमाचं मोठं यश असेल.”

दरम्यान, या सिनेमाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १०. ८० कोटी कमाई केली आहे.