Mahesh Manjrekar says Want to Show the Power of Marathi: महेश मांजरेकर हे फक्त दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय नाहीत. तर त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. हिंदीसह त्यांनी मराठी चित्रपटांतदेखील काम केले आहे.
काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १ मे २०२५ ला महेश मांजरेकर यांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता प्रेक्षकांना हा चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर म्हणाले?
महेश मांजरेकर यांनी नुकतीच ‘नवशक्ती’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठीची ताकद दाखवायची आहे, असे वक्तव्य केले आहे. महेश मांजरेकर म्हणाले, “आपल्याला मराठीची एकच ताकद दाखवायची आहे. या वर्षी मला मराठीची ताकद दाखवायची आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची ताकद बस झालं. त्यात वाईट काही नाहीये. पण, त्यांनी ताकद दाखवली. आता मला मराठीचा एकच दणका द्यायचा आहे. कारण- महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे. छावा नावाच्या सिनेमाला ८० टक्के बिझनेस महाराष्ट्राने दिला आहे. महाराष्ट्राने ताकद दाखवली. आता ती मराठी सिनेमातून दाखवायची आहे.”
महेश मांजरेकर यांनी असेही सांगितले की, मी या वर्षी मणिरत्नम, रजनीकांत, कमल हासन यांच्याबरोबर काम केले आहे. तसेच, एका पंजाबी चित्रपटात काम केले आहे. तो चित्रपट करताना मजा आली होती. तसेच, महेश मांजरेकर नुकतेच देवमाणूस या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते. या सिनेमात रेणुका शहाणेदेखील मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.
दरम्यान, काही दिवसांपासून मराठी सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवीत असल्याचे वक्तव्य अनेक कलाकार, निर्माते व दिग्दर्शकांनी केले आहे. बॉलीवूडच्या मोजक्या चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. आता महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट हे चित्र बदलू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकरांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत नटसम्राट चित्रपटात नाना पाटेकर व विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता. जेव्हा महेश मांजरेकर हे नाना पाटेकर यांच्याबरोबर काम करणार आहेत, हे इंडस्ट्रीमधील व चित्रपटसृष्टी बाहेरील लोकांना समजले तेव्हा हा चित्रपट पूर्ण होणार नाही, असे अनेकांनी सांगितले. मात्र, महेश मांजरेकरांनी हा चित्रपट करायचे ठरवले.
महेश मांजरेकर म्हणाले, “लोकांना वाटायचं नाना त्रास देईल; पण नानानं मला अजिबात त्रास दिला नाही. चित्रपट छान झाला. मध्ये दोन-तीन वेळा खटके उडाले. पण, मी त्यासाठी तयार होतो. मी हट्टी आहे. आता नानानं चित्रपट दिग्दर्शित केला, तर मी त्याचं ऐकेन. कारण- तो त्याचा दृष्टिकोन असेल. मला त्याचं काय आवडलं, तर त्यानं माझ्यापुढे जाण्याचा कधी प्रयत्न केला नाही. नाना आदरानं वागला. ते त्याचं श्रेय आहे.”