अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर अंधेरीमधील वेलव्हू रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या संपूर्ण काळात श्रेयसला त्याच्या पत्नीसह जवळच्या मित्रमंडळींनी खंबीरपणे साथ दिली. या आजारपणानंतर आता अभिनेता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच श्रेयस मुख्य भूमिकेत असलेला एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून श्रेयस रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याच्यासह या चित्रपटात गौरी इंगवले, शरद पोंक्षे, ऋषी सक्सेना, सुहास जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या कार्यक्रमात चाहत्यांनी लिहिलेलं पत्र ऐकून श्रेयस व त्याची पत्नी दीप्ती तळपदे हे दोघेही काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

श्रेयस म्हणाला, “माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. मी खरंच आता रडतोय…माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याबरोबर जे झालं त्याची उजळणी खरंच नको पण, असं कोणत्या वैऱ्याबरोबरही होऊ नये. खूप लोकांचं प्रेम, आशीर्वाद, जप, प्रार्थना या काळात मला लाभलं. लोकांनी माझ्यासाठी मोठ्या प्रेमाने सर्वकाही केलं. या जन्मात मी हे ऋण फेडू शकणार नाही. खरंतर माझा हा नवीन जन्म आहे. मी प्रत्येकाचे आभार मानतो.”

हेही वाचा : भरत जाधव यांची सरप्राईज एन्ट्री! ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत साकारली महत्त्वाची भूमिका

“कोणत्याही कलाकारासाठी आपला चित्रपट प्रदर्शित होतोय ही भावना खूप खास असते. या सगळ्या काळात जेव्हा मला आपण चित्रपट प्रदर्शित करूया असं सांगण्यात आलं तेव्हा मी खरंच आनंदी झालो. महेश दादा, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन कुलकर्णी व त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार मानतो.” असं श्रेयस तळपदेने या कार्यक्रमादरम्यान सांगितलं.

हेही वाचा : “प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याचा सामना कसा करावा?” चाहतीच्या प्रश्नावर सई लोकूर म्हणाली, “आई होणं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजारपणानंतर नवऱ्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहून दीप्ती देखील भावुक झाली होती. या सगळ्या काळात श्रेयसच्या पत्नीने प्रसंगावधान दाखवत त्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं. त्यामुळे “माझी पत्नी माझ्यासाठी सावित्री ठरली” असं अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. याशिवाय ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट येत्या १ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.