Sonali Kulkarni Dance Video : ‘वो लडकी है कहा’ या गाण्याचं नाव जरी घेतलं तरी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ‘सो-कुल’ अभिनेत्री म्हणून सोनालीला सर्वत्र ओळखलं जातं. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने नेहमीच सर्वांना भुरळ घातली आहे. अलीकडच्या काळात सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने शेअर केलेल्या एका डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या लेकीसह जुन्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सोनाली आणि कावेरी या मायलेकी २२ वर्षांपूर्वीच्या ‘डिस्को’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे.

२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल हो ना हो’ सिनेमातील ‘It’s the Time to Disco’ या गाण्याची त्याकाळी प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. अगदी आजही सिनेप्रेमींच्या मनात या सिनेमाविषयीचं आणि यातील प्रत्येक गाण्याविषयीचं प्रेम कायम आहे. हे गाणं इंडियन पॉप साँग म्हणून ओळखलं जातं. शंकर एहसान लॉय, शान, वसुंधरा दास यांनी हे गाणं गायलं आहे. ‘कल हो ना हो’ सिनेमातील सगळीच गाणी आजही घराघरांत लोकप्रिय आहेत.

सोनालीने आपल्या लाडक्या लेकीसह ‘It’s the Time to Disco’ या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. या मायलेकींचा सुंदर डान्स पराग टाकळकरने कोरिओग्राफ केला आहे. सोनाली अन् कावेरी यांचा डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री नीना कुलकर्णी सोनाली अन् कावेरीचा डान्स पाहून म्हणतात, “अगं ए मुलींनो…किती-किती गोड डान्स केलात, इतकं गोड कोण असतं?” तर, लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरने, “वाह क्या बात है” असं कमेंट्मध्ये म्हटलं आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्दा सोनालीच्या डान्स व्हिडीओचं आणि या मायलेकींमध्ये असलेल्या सुंदर बॉण्डिंगचं भरभरून कौतुक केलं आहे.