Subodh Bhave On balancing work and money: अभिनेते सुबोध भावे हा कायमच त्याच्या विविध भूमिका, चित्रपट, मालिकांमुळे चर्चेत असतात. लवकरच ते सकाळ तर होऊ द्या या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलर, तसेच काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच, सुबोध भावेंचा लूकदेखील लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात त्यांचा नेहमीपेक्षा वेगळा लूक दिसणार असल्याचे प्रदर्शित झालेल्या गाणी आणि ट्रेलरमधून दिसत आहे.
आता सुबोध भावे त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सुबोध भावे यांनी नुकतीच ‘व्हायफळ’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, काम आणि पैसे यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं, तर ते गेल्या २५ वर्षांत कसं केलं? त्यावर अभिनेते म्हणाले, “ते खूप महत्त्वाचं आहे. आपण करतोय त्याला दोन्ही अर्थांनी किंमत असायला हवी. ती किंमत आपल्यालाही मिळायला पाहिजे आणि समोरच्यालादेखील त्याचा मोबदला मिळायला पाहिजे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे.”
“मी अजिबात एक रुपयाचीही…”
“करिअरच्या सुरुवातीला दोन-तीन वर्षं मी अजिबात एक रुपयाचीही बचत करू शकलो नाही. कारण- मी पुण्यावरून मुंबईला येऊन-जाऊन काम करायचो. त्या प्रवासात सगळेच पैसे खर्च व्हायचे. मला आठवतंय मी आणि मंजिरी तीन वर्षांनी मुंबईत शिफ्ट झालो. तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या पैशांनी टीव्ही घेतला होता. ती माझी पहिली खरेदी होती. तेव्हा लक्षात आलं की, आपल्याला जर खूप वर्षं काम करायचं असेल, तर आपल्याला पैसे कमवावे लागतील. तुम्हाला ते संतुलन ठेवता आलं पाहिजे.”
“कुठे पैसे ताणून धरायचे आणि कुठे सोडायचे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. फक्त पैसे कमवायचे आहेत की माणसं आणि कलाही कमावायची आहे? तर पैसे येतात. पण, तुम्ही पैशासाठी जर सतत काम सोडत राहिलात, तर काम येत नाही. तुम्ही कशासाठी आलात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी कामासाठी आलो आहे, ही स्पष्टता मला आहे. ते काम केल्याचं मानधन म्हणून पैसे मिळणार आहेत. माझी प्राथमिकता काय आहे, हे ठरवणं महत्त्वाचं आहे.
“पैशासाठी कधीच काम सोडलं नाही”
सुबोध भावे पुढे म्हणाले, “माझी प्राथमिकता माझा अभिनय आहे. माझं काम आहे आणि ही जर माझी प्राथमिकता असेल, तर ती महत्त्वाची आहे. कष्टानं जो पैसा कमावतो, त्याला महत्त्व आहे. मग तो कितीही कमावतो. आजही मला वाटत नाही की, मी पैशासाठी कुठला चित्रपट, प्रोजेक्ट, नाटक किंवा मालिका सोडली आहे. कधीतरीच मला जे करायचं नव्हतं म्हणून सोडलं असेल; पण पैशासाठी कधीच काम सोडलं नाही.”
“हे बेभरवशाचं क्षेत्र आहे. कुठल्याही प्रकारची पेन्शन, ग्रॅज्युइटी नाही. तुमचं जे काही चांगलं-वाईट घडेल, त्याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. माझी अजिबात इच्छा नाही की, जेव्हा म्हातारपणी मी कधी निवृत्त होईन तेव्हा मला कोणापुढे मला मदत करा, म्हणून हात जोडायची वेळ यावी.”
“त्यामुळे बालगंधर्व १०० वर्षे लक्षात राहतात. सुबोध भावे…”
अभिनेते आधीच्या पीढीचे उदाहरण देत म्हणाले, “माझ्या आधीच्या पिढीत प्रचंड टॅलेंटेड माणसं होती. कला, निर्माता, दिग्दर्शनाच्या गाण्याच्या क्षेत्रातील लोकांनी पैसे कमावले; पण त्यांनी ते पैसे संपवले. साठवले नाहीत. कदाचित आम्ही इतके हिशोबी आहोत. म्हणून आमची कलासुद्धा हिशोबी आहे. ते तितके हिशोबी नव्हते. त्यामुळे त्यांची कलासुद्धा बेहिशोबी होती. त्यामुळे बालगंधर्व १०० वर्षे लक्षात राहतात. सुबोध भावे किती वर्षे लक्षात राहील काय माहीत? कदाचित त्या काळात त्यांना पैसा तितका महत्त्वाचा वाटत नसेल; पण आता तसं म्हणून चालणार नाही. कारण- राहण्यासाठी, जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा ही चैन ही नाही, ती गरज नाही.”
“कधीच फुकटात काम करायचं नाही. पैसे कमी घेऊन काम करा. तुम्ही त्यांना सांगा की, तुमच्यासाठी मी कमी पैशात काम करत आहे. माझ्या सुदैवानं ही गोष्ट माझ्या लवकर लक्षात आली; पण पैशासाठी कधी काम सोडलं नाही. मी कामासाठीच काम करीत राहिलो. पैसा येत गेला.”
या मुलाखतीत ते असेही म्हणाले, “पैसा कमावला पाहिजेच. पण त्या पैशामुळे आनंद आला पाहिजे. त्यानं दु:ख आलं नाही पाहिजे. त्या पैशानं झोप उडाली नाही पाहिजे. मला वाटतं की, ज्या क्षणी तुमची तुम्हाला गरज कळते. त्या क्षणी तुम्ही पैशाचा आनंद घ्यायला लागता. ज्यावेळी गरज आणि पैसा यामध्ये गल्लत निर्माण होते, त्यावेळी गोंधळ होतो.”
“विचारांची स्पष्टता ज्या क्षणी आयुष्यात येते ना…”
सुबोध भावे असेही म्हणाले, “मला असं वाटतं की, विचारांची स्पष्टता ज्या क्षणी आयुष्यात येते ना, त्या क्षणी आयुष्य फार सुंदर व्हायला लागतं. विचारांमध्ये गोंधळ असेल ना, तर कशातच आनंद मिळत नाही. मी कायम म्हणतो की, तुम्ही कलाकार म्हणून आलात, मग त्या एका गोष्टीचा आनंद तुम्हाला मिळालाच पाहिजेच. काही गोष्टी पैशासाठी कराव्या लागतात, तर कराव्या लागतात. त्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाहीये आणि काही काही गोष्टी कलाकाराच्या समाधानासाठी कराव्या लागतात. मग कदाचित त्यामध्ये पैशाचं समाधान मिळणार नाही. पण, यापैकी कुठलं तरी एक समाधान मिळालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत. तर ते काम करू नका.
पुढे अभिनेते म्हणाले, “मग अमुक एखादी भूमिका यथातथा असू दे, सिनेमा यथातथा असू दे; पण पैसे उत्तम मिळणार आहेत. त्यानं सहा महिने घर चालणार आहे ना? तर ते काम करावं. मग सेटवर गेल्यानंतर गोंधळ नसतो. किंवा पैसे नाहीत; पण भूमिका उत्तम असेल. काम करताना मजा येणार असेल, तर मग पैशाकडे बघितलं गेलं नाही पाहिजे. कारण- ते काम पुढचं अनंत काम करण्याची ऊर्जा देणारं असतं”, असे म्हणत त्यांनी काम करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, विचारांची स्पष्टता किती महत्वाची असते, याबद्दल वक्तव्य केले.