Suraj Chavan Visits Abhijeet Sawant Home : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सिनेविश्वात मुख्य हिरो म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमात सूरज प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या ‘गुलीगत किंग’ त्याच्या सिनेमाची जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय. याच निमित्ताने सूरजने ‘बिग बॉस’चा उपविजेता व प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतच्या घरी भेट दिली.
अभिजीत व सूरज यांची ‘बिग बॉस’च्या घरात एकदम छान जोडी जमली होती. सूरज त्याला प्रेमाने अभी दादा म्हणायचा. शोमध्ये त्याने कायम अभिजीतला आपला मोठा भाऊ मानलं. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सूरजने गायकाच्या घरी जाऊन त्याची व त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
सूरज पोस्ट शेअर करत लिहितो, “आपल्या भारताचा पहिला इंडियन आयडल आणि माझा मोठा भाऊ अभिजीत सावंत. माझा लाडका अभी दादा…याला ‘बिग बॉस’नंतर आज पुन्हा एकदा भेटून खूप आनंद झाला आहे. शिल्पा ताई ( अभिजीतच्या पत्नी ) तुमच्या हातचं घरचं जेवण जेवून खूप समाधान मिळालं. याचबरोबर दादाच्या आईचे आता ती माझीही आईच आहे…तिचे भरभरून आशीर्वाद मिळाले खूप बरं वाटलं. अभी दादा, ताई आणि आई तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम राहूदे…त्याच्या दोन बाळांना भेटून सुद्धा आनंद झाला.”
तर, सूरजला पहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा देताना अभिजीत सावंत म्हणाला, “साधारण २० वर्षांपूर्वी माझी पण अशीच सुरुवात झाली होती. मी मुंबईत राहणारा होतो पण, अतिशय छोट्या जागेतून माझीही सुरुवात झाली होती. मी सुद्धा एका शोमुळे पुढे आलो. मी नेहमी म्हणतो, सूरजमध्ये मी स्वत:ला बघतो. कारण, ज्याप्रकारे एक साधाभोळा मुलगा इथपर्यंत पोहोचतो तसाच माझाही प्रवास होता. माझ्या जीवनातील सगळ्यात आवडतं गाणं मी सूरजसाठी गाणार आहे. ते गाणं म्हणजे ‘मोहब्बतें लुटाऊंगा’…ज्याप्रकारे तुम्ही मला प्रेम दिलंत तसंच प्रेम तुम्ही सूरजला सुद्धा द्या. त्याचा सिनेमा खूप हिट होऊदे.”
अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.